आरटीई अंतर्गत जिल्ह्यात १,७८४ विद्यार्थ्यांना प्रवेश
By admin | Published: April 25, 2017 01:09 AM2017-04-25T01:09:22+5:302017-04-25T01:09:22+5:30
२५ टक्के प्रवेश: अद्यापही ५९८ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
अकोला: शिक्षण हक्का कायद्यात (आरटीई) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार दरवर्षी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आतापर्यंत १,७८४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला; परंतु अद्यापही ५९८ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहेत.
आरटीईनुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. शाळेच्या एक ते तीन किमीच्या आत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यंदा जिल्ह्यातील १८८ शाळांनी आरटीई पात्रता मिळविली. या शाळांमध्ये प्रवेशासाठी जिल्ह्यात ३ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते; परंतु आरटीई पात्र शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर २ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील १,७८४ विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले आहे. अद्यापही ५९८ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वाट पाहावी लागत आहे; परंतु अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांना झुलविल्या जात आहे. अनेक शाळांमध्ये नर्सरीमध्ये प्रवेश दिल्या जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. एवढेच नाही तर काही शाळांमध्ये गतवर्षी आरटीईनुसार प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना शुल्काची मागणी करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचे शुल्क शासन अनुदान स्वरूपात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना उपलब्ध करून देते. यासंदर्भात शिक्षण विभागाशी संपर्क साधल्यावर त्यांनी पालकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्या, असे स्पष्ट केले.