नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल अडकले !
By admin | Published: September 21, 2016 02:11 AM2016-09-21T02:11:05+5:302016-09-21T02:11:05+5:30
जिल्हाधिका-यांचे निर्देश डावलले; एकाही तालुक्यातील पैसेवारीचा अहवाल २0 सप्टेंबरपर्यंंंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही.
संतोष येलकर
अकोला, दि. २0 - जिल्हय़ातील या वर्षीच्या खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३0 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल २0 सप्टेंबरपर्यंंंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना दिले; मात्र जिल्हय़ातील एकाही तालुक्यातील पैसेवारीचा अहवाल २0 सप्टेंबरपर्यंंंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे तालुका स्तरावर पैसेवारीचे अहवाल अडकल्याने, जिल्हय़ातील नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सन २0१६-१७ या वर्षीच्या जिल्हय़ातील लागवडी योग्य गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३0 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर पीक कापणी प्रयोग घेण्यात यावे आणि त्याआधारे खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल तयार करून २0 सप्टेंबरपर्यंंंत पैसेवारीचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना गत ७ सप्टेंबर रोजी दिले.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर संबंधित मंडळ अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, सरपंच, प्रगतिशील शेतकरी, सहकारी पतपुरवठा संस्थेचे अध्यक्ष, दोन अल्पभूधारक शेतकरी (एक महिला शेतकरी) आणि तलाठी इत्यादी सात सदस्यांची समिती स्थापन करून नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी तहसीलदारांना दिल्या. नजरअंदाज पैसेवारीचे तालुका स्तरावरील अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे. ३0 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला आहे; मात्र जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार २0 सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तालुक्यांपैकी एकाही तालुक्यातील नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही.
तालुका स्तरावर खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल रखडल्याने जिल्हय़ातील खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हय़ात खरीप पिकांचे असे आहे पेरणी क्षेत्र!
पीक हेक्टर
सोयाबीन २१२८७७
कापूस १0१९३३
तूर ६१0१0.८
खरीप ज्वारी २२२६४
मका ४४२
मूग ३१८८६
उडीद २८२00
तीळ १३६६.११
इतर पिके ७७0
सूर्यफूल 0२
भुईमूग 0४
एकूण ४६0७५४.९१
सोयाबीनच्या उत्पादनात घट
गत महिनाभराच्या कालावधीत पावसाने दांडी मारली. त्यामुळे जिल्हय़ातील काही भागांत हाताशी आलेले सोयाबीनचे पीक सुकले. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने, शेतकरी
पुन्हा संकटात सापडला. प्रशासनामार्फत खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये उत्पादनात घट झालेल्या सोयाबीन पिकाची नजरअंदाज पैसेवारी किती निश्चित केली जाते, याकडे आता शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.