अनाथ मुलांच्या संवेदना समजून घ्या अन् कार्य करा - पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:00 PM2018-11-11T18:00:41+5:302018-11-11T18:01:29+5:30
अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.
अकोला: समाजात अनाथ मुलांची वाढती संख्या मनाला चटका लावणारी आहे. मुलांच्या अनाथ होण्याला विविध कारणे असून त्यांना आश्रमाच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या संवेदना समजून घ्या अन् त्यादिशेने कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.
उत्कर्ष शिशूगृह व गायत्री बालिकाश्रमाच्यावतीने रविवारी स्रेह संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी व्यासपिठावर अंजनगाव सुर्जी येथील मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, विहींपचे महामंत्री मिलींद परांडे, महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, स्वागताध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, उत्कर्ष शिशूगृहाचे अध्यक्ष दादाजी पंत, बाल हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सुनंदा देसाई, मनीषा कुळकर्णी, रश्मी शर्मा आदी उपस्थित होते. कौटुुंबिक परिस्थिती कशीही असो, मुलांवर आई आणि वडील दोघेही भरभरून प्रेम करतात. तरीही मुलांना आईच्या मायेची उब हवीहवीशी वाटते. लहान मुलांच्या अनाथ होण्याला अनेक कंगोरे असतात. अशा चिमुकल्या मुलांना आश्रमांमध्ये भौतिक सुविधा मिळत असल्या तरी त्यांच्या भावना, संवेदनाही समजून घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अनाथ मुलांची संख्या चिंताजनक आहे. अशावेळी त्यांचे पालन पोषण करण्यासाठी विचारांपेक्षा कृतीची गरज आहे. उत्कर्ष शिशूगृह व गायत्री आश्रमाची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद असून समाजात एकही बालक अनाथ राहणार नाही, यादिशेने समाजकार्य पुढे नेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश काळकर यांनी तर सुत्र संचालन शारदा बियाणी यांनी केले.
अनाथांच्या वेदनांवर उपाय शोधला!
उत्कर्ष शिशूगृहाची आजवरची वाटचाल पाहता समाजातील अनाथ मुला-मुलींच्या वेदनांवर शिशूगृहाने उपाय शोधल्याचे दिसून येते. आश्रमाच्या कार्यामुळे अनाथ बालकांना आधार मिळाला असून या समाजकार्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरात अनाथ मुलांसाठी संगोपनाचे प्रकल्प सुरु आहेत. आश्रमातील चिमुकल्यांना प्रेमाची,मायेची ऊब हवी असते. यासाठी त्यांच्यात मिसळा, त्यांना आधार देण्यासाठी समोर येण्याचे आवाहन विहींपचे महामंत्री मिलींदजी परांडे यांनी यावेळी केले.