अडीच सेंटिमीटरने कमी झालेला पाय पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:54+5:302020-12-25T04:15:54+5:30
मूर्तीजापूर: खराब झालेला पायाचा सांधा काढून त्या ठिकाणी नवीन सांध्याचे प्रत्यारोपण करण्याची शस्रक्रिया यशस्वीरीत्या झाली असून, रुग्णाचा अडीच सेंटिमीटरने ...
मूर्तीजापूर: खराब झालेला पायाचा सांधा काढून त्या ठिकाणी नवीन सांध्याचे प्रत्यारोपण करण्याची शस्रक्रिया यशस्वीरीत्या झाली असून, रुग्णाचा अडीच सेंटिमीटरने कमी झालेला पायदेखील पूर्ववत करण्यात यश आले. मूर्तिजापूर शहरात प्रथमच माेठी शस्रक्रिया करण्यात नागपूरच्या डाॅ. अभिनव केसरकर यांना यश आले आहे.
मूर्तिजापूर येथील रहिवासी अरुण विठ्ठलराव वानखेडे, वय ६० वर्षे हे तीन वर्षांपूर्वी पडले होते. मणक्यांचा आजार असल्याचा समज झाल्याने त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले; परंतु फरक पडला नाही. दरम्यान, त्यांचा पाय अडीच सेंटिमीटरने कमी होऊन त्यांना वाकून चालावे लागत होते. त्यानंतर त्यांनी मूर्तिजापूर येथील बाबन बाल रुग्णालयात दर शनिवारी नागपूरहून येणारे आर्थोपेडिक सर्जन डॉ. अभिनव केसरकर यांना १८ ऑक्टोबर २०२० रोजी दाखवले. त्यांनी त्यांच्या सांंध्याचे फोटो काढल्यानंतर त्यांना उजव्या बाजूच्या पायाचा सांधा पूर्णपणे खराब झाल्याचे दिसून आले. पायाच्या सांध्याचे प्रत्याराेपण करण्याचा निर्णय डॉ. अभिनव केसरकर यांनी घेतला.
ही शस्रक्रिया मूर्तिजापूर येथील डॉ. पंकजकुमार पातालबंसी यांच्या सुदर्शन आर्थोपेडिक हॉस्पिटल व ट्रामा सेंटरमध्ये केली. काही कारणास्तव दोन वेळा शस्रक्रिया पुढे ढकलली होती. जवळपास तीन तास ही शस्रक्रिया करून प्रत्यारोपण करण्यात यश आले. अरुण वानखडे यांच्यावर शस्रक्रिया झाल्यानंतर त्यांची पूर्णपणे देखभाल व काळजी घेण्याची जबाबदारी डॉ. पातालबंसी यांनी पार पाडली.
सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत माफक दरात गुडघ्याचे कृत्रिम सांध प्रत्यारोपण (जॉइंट रिप्लेसमेंट) शस्रक्रिया मूर्तिजापूर शहरात सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून सुरू केल्या आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या बनावटीचे सांधे प्रत्यारोपण करण्याचा मानस आहे.
-डॉ. अभिनव केसरकर, आर्थोपेडिक सर्जन, नागपूर