अज्ञात व्यक्तीने कांदाच्या गंजीमध्ये टाकला युरिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:47+5:302021-06-19T04:13:47+5:30
आलेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन इंगळे आणि भूमिहीन रमेश इंगळे यांनी कांतीलाल जैन यांच्या शेतामध्ये बटाईने ३ एकर क्षेत्रामध्ये ...
आलेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन इंगळे आणि भूमिहीन रमेश इंगळे यांनी कांतीलाल जैन यांच्या शेतामध्ये बटाईने ३ एकर क्षेत्रामध्ये एकरी पन्नास हजार रुपये खर्च करून कांदा लागवड केली होती. यामध्ये त्यांना चांगला मालही झाला. कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेने त्यांनी गावालगत असलेल्या गजमली प्लॉट शेतामध्ये वेगवेगळ्या कांदा चाळीमध्ये कांदा भरून ठेवला होता; परंतु १६ जून रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने दोन्ही चाळीतील २०० क्विंटल कांद्यामध्ये रासायनिक युरिया खत टाकले. हा प्रकार १७ जून रोजी रमेश इंगळे यांच्या लक्षात आला. त्यांनी या प्रकरणाची चान्नी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. आलेगाव पोलीस चौकीतील जमादार बाळकृष्ण इंगळे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अज्ञात व्यक्तीने केलेल्या खोडसाळपणामुळे कष्ट करून पिकविलेला दोनशे क्विंटल कांदा सडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.