विस्थापित शिक्षकांची अकोला जिल्हा परिषदेत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:35 PM2018-05-30T18:35:40+5:302018-05-30T18:35:40+5:30
वरिष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला, त्याविरोधात शेकडो शिक्षकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.
अकोला : जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या १७५४ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या बदल्यामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी अद्यापही प्रसिद्ध न केल्याने अन्याय झाला. तसेच संवर्ग १ व २ मधील शिक्षकांची खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली करण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला, त्याविरोधात शेकडो शिक्षकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.
शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या शासन स्तरावरून आॅनलाइन करण्यात आल्या. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत मोठे घोळ झाले. तो घोळ उघड होण्यासाठी बदली झालेल्या शिक्षकांना रूजू करून घेताना आॅनलाइन प्रक्रियेत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक होते. या बाबींकडे पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. शिक्षकांनी केलेल्या दाव्यातील खरेपणाही तपासण्यात आला नाही. त्यामुळे इतर पात्र शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. संवर्ग २ अंतर्गत ३० किमीपेक्षा जास्त अंतर नसलेल्या शिक्षकांची तसेच संवर्ग १ ची कोणतीही तपासणी न करताच पदस्थापना देणे, सेवाज्येष्ठ शिक्षकांनी मागितलेली गावे कनिष्ठ शिक्षकांना देण्यात आली. संवर्ग चार, संवर्ग दोनमधून अर्ज केलेल्या शिक्षिकांना ३० किमीपेक्षा जास्त अंतराची गावे मागणी केल्यानुसार कशी देण्यात आली, त्यांना ३० किमीच्या आत देणे आवश्यक होते. बदली झालेल्या शिक्षकांची यादीही प्रसिद्ध केली नाही. त्यातच विस्थापित झालेल्या ५६४ शिक्षकांचीही यादी प्रसिद्ध केली नाही. त्यांना कोणी खो दिला, त्यांच्या जागेवर कोण आले, ही माहिती न मिळाल्याने वरिष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला. तो तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी दुपारी जिल्हा परिषदेत धाव घेतली.
विषय शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी
दरम्यान, शिक्षक संघटना समन्वय समितीने घेतलेल्या बैठकीत विषय शिक्षकांच्या नियुक्त्या तातडीने करा, त्यांची पदे विस्थापित शिक्षकांसाठी खुली करा, या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले. विस्थापित शिक्षक आणि उपलब्ध जागांमध्ये तफावत आहे. ५०० पेक्षाही अधिक विस्थापित शिक्षकांसाठी ५९ जागा उपलब्ध आहेत. उर्वरित ४५० पेक्षाही अधिक शिक्षकांच्या पदस्थापनेचा वांधा होणार आहे. विषय शिक्षकांची पदे बदली पोर्टलवर खुली करावी, या मागणीचे निवेदन समन्वय समितीने दिले. यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी शशिकांत गायकवाड, प्रकाश चतरकर, नामदेव फाले, देवानंद मोरे, जव्वाद हुसेन, प्रमोद मोकळकर, राजेश देशमुख, शंकर तायडे, मंगेश देशपांडे, रजनीश ठाकरे, टी.एन. मेश्राम, शैलेंद्र गवई उपस्थित होते.