केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी अकाेल्यात; लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संचलन समितीचा घेणार आढावा
By आशीष गावंडे | Published: February 10, 2024 09:35 PM2024-02-10T21:35:02+5:302024-02-10T21:35:13+5:30
समितीच्या माध्यमातून लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेता अमित शहा १५ फेब्रुवारी राेजी अकाेल्यात दाखल हाेणार आहेत.
अकाेला: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेता अमित शहा १५ फेब्रुवारी अकाेला शहरात दाखल हाेणार आहेत. लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या संचलन समितीच्या कामकाजाचा ते आढावा घेऊन भाजपचे लाेकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसाेबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. लाेकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर पक्षाने संचलन समिती गठीत केली असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी साेपविण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेता अमित शहा १५ फेब्रुवारी राेजी अकाेल्यात दाखल हाेणार आहेत.
आढावा बैठकीत शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुमारे २० संघटनमंत्री, पश्चिम विदर्भातील सर्व लाेकप्रतिनिधी, प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर यांच्यासाेबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने भाजपच्या अंतर्गत गाेटात हालचाली वाढल्याचे बाेलल्या जात आहे.