पातुरात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:24+5:302021-09-02T04:41:24+5:30
पातूर: मुलगी म्हणजे खर्चाला भार, परक्याचे धन, विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणार छळ, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या ...
पातूर: मुलगी म्हणजे खर्चाला भार, परक्याचे धन, विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणार छळ, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा घटना नेहमी घडतात; मात्र अशातच काही अशा सुखद घटनाही घडत आहेत. अशीच एक घटना पातूर तालुक्यातील भीम नगरमधील रहिवासी नविता व रूपेश खंडारे यांना कन्यारत्न झाल्याने त्यांनी प्रथम कन्यारत्न जन्म महोत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
उपक्रमात वृक्षारोपण, पुस्तके भेट, महिलांचा सन्मान, तसेच परिसरात घरोघरी पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले मैदानात दि. २३ ऑगस्ट २०२१ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पातूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ सुरवाडे, न. प.चे माजी नगराध्यक्ष हिदायत खा रुम खा, शिर्ला ग्रा. पं. सदस्य मंगल डोंगरे, फिरोज खान, सै.इरफान, शारीख भाई, मेहताप भाई, सुधाकर शिंदे, अनिख पटेल, राजुभाई, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांना वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा युवा संस्था पुरस्कार प्राप्त कानशिवणी येथील संत कबीर आरोग्य व शिक्षण संस्था अध्यक्ष प्रवीण वाहुरवाघ, स्व. विनायक राखोंडे प्रतिष्ठान पातूरचे अध्यक्ष सागर राखोंडे यांचा गौरव करण्यात आला. रमाई उपासिका संघास विविध पुस्तके भेट देऊन वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विशाल राखोंडे, प्रवीण सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रूपेश खंडारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश डोंगरे, भगवान पोहरे, गंगाराम डोंगरे, प्रकाश बोरकर, सोनपान डोंगरे, प्रवीण बोरकर यांनी परिश्रम घेतले.