विद्यापीठे परिवर्तनाची केंद्रे व्हावी!
By admin | Published: July 9, 2017 09:22 AM2017-07-09T09:22:18+5:302017-07-09T09:22:18+5:30
अकोल्यात राज्यस्तरीय महाअँग्रिव्हिजन-२0१७ चे थाटात उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जागतिक स्पर्धेत कृषी विद्यापीठांची जबाबदारी वाढली असून, अन्न धान्य उत्पादकतेसोबतच शेतमालाचे मूल्यवर्धन गावपातळीवरच करू न शेतकरी सुमृद्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठे कृषी परिवर्तनाची केंद्र ठरावीत, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर यांनी शनिवारी येथे केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांतद्वारा आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महाअँग्रिव्हिजन-२0१७ च्या उद्घाटन प्रसंगी कृषी महाविद्यालयाच्या स्व. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटस्वरू लू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंबेकर यांनी कृषी क्षेत्राला आलेली मरगळ दूर करण्यासाठी उत्पादक, तंत्रज्ञ, शासनकर्ते आणि नियोजनकर्ते यांचे सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे सांगितले. सिंगापूर येथील क्रांतीचे उदाहरण उपस्थितांना देत सामाजिक बदलासाठी राजकीय नेतृत्वावर विसंबून न राहता कर्तृत्ववान विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यावर अधिक विश्वास ठेवावा, असा सल्लादेखील त्यांनी या प्रसंगी दिला. कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आदींनी शेतीला अधिक फायदेशीर बनवीत नव्या पिढीतील तरुणांना शेतीकडे वळा, असा नारा देत नवे किंवा जुने कोणतेही तंत्र जे शेतीला आवश्यक आहे, त्याचा प्रचार- प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा अधिष्ठाता कृषी डॉ. विलास भाले यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषी शिक्षणातील संधी व प्रमुख उपलब्धीविषयी कृषी पदवीधरांना अवगत केले. पाचव्या अधिष्ठाता समितीच्या विविध शिफारशींनुसार आता पुढील कृषी शिक्षणाची वाटचाल होणार असून, नवीन अभ्यासक्रम अधिक प्रयोगशील तथा कृतिशील आहे, ही समाधानाची बाब आहे, असे नमूद केले.
कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारूदत्त मायी यांनी कृषीपूरक उद्योगांना अधिक लोकाभिमुख करीत ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांचे जाळे घट्ट करीत कायमस्वरूपी रोजगार निर्मिती साधावी व धान्योत्पादन ही प्राथमिकता तर कृषी प्रक्रिया ही त्या पुढची पायरी असल्याचे जनमनात बिंबवावे, असा सल्ला उपस्थित विद्यार्थी वर्गाला दिला. स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी. व्यंकटेश्वरुलू यांनी अशा प्रकारच्या संमेलनाची गरज अधोरेखित केली. युवकांचा देश ही आपल्या देशाला मिळालेली उपाधी शेती आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय खर्या अर्थाने सार्थ होणार नाही, असे सांगितले.
सत्राचे प्रास्ताविक प्रांत प्रमुख प्रा. नितीन गुप्ता यांनी केले. याप्रसंगी कृषी पदवीधरांकडून प्राप्त संशोधनपर लेख असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनसुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. आभार प्रदर्शन प्रांत निमंत्रक श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी कृष्णा गांगुर्डे, डॉ के. बी. पाटील, बाबासाहेब गोरे, विलास शिंदे यांच्यासह अभाविपचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, प्रांत मंत्री विक्रमजित कलाने, प्रांत उपाध्यक्ष प्रा. राजू बोरकर, पंदेकृविचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची उपस्थिती होती. राज्याच्या विविध भागातून मोठय़ा संख्येने आलेले कृषी पदवीधर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संयोजन समितीचे डॉ. श्याम मुंजे, दीपिका पडोळे, डॉ. जयंत उत्तरवार, सचिन लांबे, संदीप ठेंग, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, नितीन पाटील यांच्यासह अभाविपचे अकोला महानगर कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.