विभागनिहाय होणार कौशल्य विद्यापीठ
By admin | Published: October 7, 2015 02:02 AM2015-10-07T02:02:31+5:302015-10-07T02:02:31+5:30
अमरावती विभागासाठी अकोला किंवा यवतमाळ मुख्यालय होणार असल्याची राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची माहिती.
अकोला: उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता आणि दुसरीकडे वाढत असलेली बेरोजगारी यावर उपाययोजना म्हणून ज्या परिसरात उद्योग असतील त्या उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करणारे अभ्यासक्रम त्या-त्या परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकविण्यावर राज्य शासन भर देत आहे. त्यासाठी सर्वच विभागांमध्ये कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. अमरावती विभागातील विद्यापीठाच्या मुख्यालयासाठी अकोला किंवा यवतमाळचा प्राधान्याने विचार केला जात असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिली. अमेरिका दौर्यावरून परत आल्यानंतर डॉ. पाटील यांनी अकोला येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येणार्या योजनांची माहिती दिली. या दौर्यात त्यांनी कौशल्य विकासाबाबत अमेरिकेत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तेथे प्रशिक्षण घेणार्या युवकांसाठी त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमावर आधारित रोजगार आधीच उपलब्ध असतो. त्याच धर्तीवर आता राज्यात विभागवार कौशल्य विद्यापीठ सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती डॉ. रणजित पाटील यांनी दिली. राज्यातील आयआयटी आणि पॉलिटेकनिक कॉलेजमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण कालबाह्य झाले आहे. त्याचा प्रत्यक्ष रोजगार मिळविताना फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे आता नव्याने अभ्यासक्रमांची मांडणी करून रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी या विद्यापीठांचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*फोर्स वनचे प्रशिक्षण केंद्र पुण्यात
दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी मुंबईत फोर्स वनची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता पुण्यातही फोर्स वनचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
*सायबर गुन्हेगारी रोखण्यात पडतो कमी!
आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबरच्या माध्यमातून होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठय़ाप्रमाणात काम झाले आहे. भारतात मात्र अशाप्रकारचे गुन्हे शोधून काढण्यासाठी किंवा सायबरच्या माध्यमातून गुन्हय़ांचा कट शिजत असेल तर वेळीच शोधून काढण्यात र्मयादा येतात. घटना घडून गेल्यावरच त्याबाबत माहिती मिळते. तोपर्यंंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून परस्पर सहकार्यातून 'क्रॉसबॉर्डर' नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याची योजना राज्य शासनाने आखली असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
*महाराष्ट्र हेल्थ फोरम
अमेरिकेत असलेल्या महाराष्ट्रीयन कुटुंबीयांच्या मदतीने राज्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा आणि मुला-मुलींच्या सहकार्यासाठी महाराष्ट्र हेल्थ फोरमची स्थापना करण्यात येत आहे. या फोरमच्या माध्यमातून आर्थिक आणि इतर प्रकारचे सहकार्य मिळणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.