विवाहितेचे अनैसर्गिक लैंगिक शोषण; पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:07 AM2019-12-25T11:07:55+5:302019-12-25T11:37:26+5:30
काही दिवस सुरळीत गेल्यानंतर पतीने तिला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अनैसर्गिक लैंगिक संबंधासाठी पत्नीवर जबरदस्ती करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील पती, सासरची मंडळी व अकोल्यातील एका नातेवाइकाविरुद्ध खदान पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.
खदान पोलीस ठाण्यांतर्गत राहणाºया २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिची पाच लाख रुपयांमध्ये विक्री करून लग्न लावून देण्यात आले. २0 जून २0१७ रोजी तिचे लग्न अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या ४५ वर्षाच्या इसमासोबत लग्न झाले. त्यानंतर विवाहिता ही पाथर्डीला गेली. काही दिवस सुरळीत गेल्यानंतर पतीने तिला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य केले.
विवाहितेने पतीला विरोध केला. त्यानंतरही पतीने सातत्याने तिचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केले. यासंदर्भात विवाहितेने सासरची मंडळी, दोन नणंद यांनासुद्धा सांगितले; परंतु त्यांनीही दुर्लक्ष केले.
एवढेच नाही, तर पती तिला नेहमी मारहाण करायचा, धमकवायचा. एवढेच नाही, तर पती त्याच्या मित्रांना घरी बोलावून पार्टी करायचा. या छळाला कंटाळून विवाहितेने अखेर अकोला गाठले आणि खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती, नणंद , पतीचे सहा मित्र यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७७, ४९८(अ), ३२४, ४२0, ५0४, ५0६(३४) गुन्हा दाखल केला.
नातेवाइकाने पाच लाखांमध्ये केली विक्री!
लग्न झाल्यानंतर पतीने पीडित विवाहितेला सांगितले की, तुझ्या एका जवळच्या नातेवाइकाने पाच लाख रुपयांमध्ये तुझी विक्री केली आहे. त्यामुळे तुला माझे ऐकावेच लागेल. नातेवाइकांनीसुद्धा तुला पाच लाख रुपयांमध्ये खरेदी केले असल्याची बाब कबूल केली. त्यामुळे पती सातत्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करायचा. याबाबत सासरच्या नातेवाइकांना सांगितल्यावरही त्यांनी दुर्लक्ष केले.
इच्छा नसतानाही करावे लागले लग्न
पीडित युवती व आरोपी पती या दोघांमध्ये तब्बल २३ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे युवतीने त्याला लग्नासाठी नकार दिला होता; परंतु त्याने नातेवाइकांच्या माध्यमातून युवती व तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला. त्यामुळे युवतीला नाइलाजाने त्याच्यासोबत लग्न करावे लागले.
पीडिता विवाहिता दुसरी पत्नी, तिसरा विवाहही केला!
आरोपीचा पीडित विवाहितेसोबत विवाह करण्यापूर्वी २00१ मध्ये पहिला विवाह झालेला होता.
पीडितेचा दुसरा विवाह आरोपीसोबत झाल्यानंतर काही महिन्यांनी पीडितेला पतीने तिसरा विवाहसुद्धा केल्याची माहिती मिळाल्यावर तिला धक्काच बसला.
स्मशानातील राख व शक्तिवर्धक गोळ्यांचा वापर
पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार पती तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्यापूर्वी तिला शक्तिवर्धक गोळ्या खाऊ घालायचा आणि स्वत:ही घ्यायचा. एवढेच नाही, तर आरोपी पती अमावस्या व पौर्णिमेच्या रात्री स्मशानात राहून अंगाला राख फासायचा आणि पीडितेलासुद्धा राख फासण्यास सांगायचा.