अकोल्यातील जबरी चोरीच्या गुन्हय़ांची ठाणे पोलिसांकडून उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:35 AM2018-01-13T02:35:12+5:302018-01-13T02:36:42+5:30
अकोला : मुंब्रा येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींनी अकोल्यातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जवळपास दीड कोटी रुपयांची सोन्याची लुटमार या आरोपींनी केली होती. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांचे एक पथक ठाण्याकडे रवाना झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुंब्रा येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींनी अकोल्यातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जवळपास दीड कोटी रुपयांची सोन्याची लुटमार या आरोपींनी केली होती. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांचे एक पथक ठाण्याकडे रवाना झाले आहे.
मुंब्रा येथील एका घरफोडीच्या आरोपींची माहिती गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने नागपूर आणि मुंबईच्या जव्हेरी बाजार भागात शोध घेऊन चौघांना अटक केली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथील भागीरथ रामस्वरूप खरगयाल (३0), कामठी तालुक्यातील बिरजू भीमराव चहादे (२७), विनय गणेश भोयर (३२) आणि लक्ष्मण रामकिसन पाटील (३८) यांना अटक केली. या चौघा आरोपींची कसून चौकशी केल्यावर भागीरथ रामस्वरूप खरगयाल आणि लक्ष्मण रामकिसन पाटील यांनी कामठी येथील मोनू मनपिया, आकाश माहतो आणि उत्तर प्रदेशातील अजय नामक आरोपीसोबत मुंब्रा येथील घरफोडीसोबतच अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकातून २0१५ मध्ये कुरियरने सराफा व्यापार्यांचे आलेले ७५ लाख रुपये किमतीचे सोने आणि २0१७ मधील रेल्वे स्टेशन चौकातच शस्त्राच्या धाकावर एका इसमाकडून ६७ लाख ५0 हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली. या दोन्ही प्रकरणात रामदासपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अकोल्यातील दोन्ही गुन्हय़ात या आरोपींचा समावेश असल्याने, त्यांना ताब्यात घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांचे एक पथक एपीआय प्रेमानंद कात्रे यांच्या नेतृत्वात ठाण्यासाठी रवाना झाले आहे.
सोने लुटमार प्रकरणातील आरोपी
ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी रेल्वेगाडीने कुरियरमार्फत आलेले ७५ व ६७ लाख रुपये किमतीचे सोने कुरियर कंपनीचे कर्मचारी घेऊन जात असताना, आरोपींनी शस्त्राच्या धाक दाखवून हे सोने लुटले होते. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला होता. दोन ते तीन वर्ष उलटूनही या गुन्हय़ांतील आरोपी शोधण्यात अकोला पोलिसांना अपयश आले. त्यामुळे या दोन्ही गुन्हय़ांचा तपास थंड बस्त्यात पडला होता. परंतु, आता ठाणे पोलिसांनी या दोन्ही जबरी चोरीच्या गुन्हय़ांची उकल केल्यामुळे अकोला पोलिसांना आरोपींकडून गुन्हय़ातील सोने जप्त करण्यात कितपत यश मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.