निधी वळता केल्याने जिल्हा परिषद सत्ता पक्षात अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:46 AM2021-03-31T10:46:48+5:302021-03-31T10:47:06+5:30
Akola Zilla Parishad : २५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयानुसार महानगरपालिकेकडे वळता करण्यात आला.
अकोला: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे (दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ५० कोटींच्या निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला; मात्र उर्वरित २५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयानुसार महानगरपालिकेकडे वळता करण्यात आल्याने जिल्हा परिषदेतील सत्ता पक्षात अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासकामांसाठी चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुषंगाने दलित वस्ती योजनेंतर्गत मंजूर निधीतून जिल्ह्यातील ३५० गावांत ९०० वस्त्यांमध्ये विकासकामांचे नियोजन जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले. तसेच निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, मंजूर निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी २४ मार्च रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला असून, जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयानुसार उर्वरित २५ कोटी रुपयांचा निधी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशानुसार २७ मार्च रोजी महानगरपालिकेकडे वळता करण्यात आला. दलित वस्तीच्या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला मंजूर असलेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी मनपाकडे वळता करण्यात आल्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेतील सत्तापक्षात अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे निधी वळता करण्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली माहिती!
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे (दलित वस्ती) योजनेंतर्गत जिल्ह्यातील विकासकामांसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकरिता मंजूर ५० कोटी रुपयांच्या निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी मनपाकडे वळता केल्याच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी अकोल्यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक घेत माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने आदी पदाधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकारी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार!
जिल्ह्यातील दलित वस्तींच्या कामांसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकरिता मंजूर निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी मनपाकडे वळता करण्यात आल्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद सत्ता पक्षाचे पदाधिकारी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. निधी वळता करण्यात आल्याच्या आदेशा संदर्भात पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद सत्ता पक्षाकडून यासंदर्भात पुढील रणनिती निश्चित करण्यात येणार असल्याचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सांगितले.