अकोटात शांतता समिती सदस्य यादीवरून अशांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:20 PM2020-09-11T12:20:52+5:302020-09-11T18:01:01+5:30
अकोट शहरात अंतर्गत समाजातील विविध घटकांत ही यादी अशांतता धुमसविण्यास कारणीभूत ठरत आहे.
- विजय शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: अकोट शहर पोलिसांनी नव्याने तयार केलेल्या शांतता समिती यादीत अनेक वर्षांपासून शांतता प्रस्थापित करण्यास योगदान असलेल्या सक्रिय समाजदूताना निष्क्रिय ठरविण्यात आले आहे. या यादीवरून समाजातील महत्त्वाच्या घटकांत अंतर्गत कलह सुरु झाला आहे. एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे शांतता व जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा, याकरिता ‘सर्व धर्मांची शिकवण एकच’, हा उपक्रम स्वत: राबवित असताना समाजातील शांततेकरिता योग्यता असलेल्यांना डावलण्यात आल्याने अकोट शहरात अंतर्गत समाजातील विविध घटकांत ही यादी अशांतता धुमसविण्यास कारणीभूत ठरत आहे.
कायदा व सुव्यवस्था टिकवून राहण्यासाठी समाजात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी शांतता समिती सदस्यांची पोलीस स्टेशन स्तरावर निवड करण्यात येते आहे. धार्मिक उत्सव, सण, मिरवणुका, दंगली आदी संवेदनशील काळात शांतता टिकवण्यासाठी समाजातील विविध क्षेत्र व जाती-धर्माच्या लोकांचा या शांतता समितीमध्ये समावेश करण्यात येतो.
यावर्षी नव्यानेच अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समितीची यादी तयार करण्यात आली. जिविशाच्या २१ आॅगस्टच्या पत्राचा संदर्भ देत तातडीने दोन दिवसांतच नव्याने सदस्यांची निवड करीत ही यादी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना २४ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आली. नाव, पत्ता, मोबाइल नंबरसह २६ जणांचा समावेश या समिती यादीत करण्यात आला आहे; परंतु या शांतता समिती निवड यादीत अनेकांना डावलण्यात आल्याने समाजातील विविध घटकांत नाराजीचा सूर उमटला आहे. अनेक वर्षांपासून शांतता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र काम करणारे अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तथा राजकीय ,संघटनाचे पदाधिकारी यांना डावण्यात आले आहे. ज्या लोकांचा आपापल्या समाजात मानसन्मान आहे, ज्यांचे म्हटल्यावर समाजात शांतता निर्माण होण्यासाठी पोलिसांना मदत केली, अशा अनेक जणांची समितीमधून सुट्टी करण्यात आली. शांतता समितीत स्थानिक पोलिसांची वरिष्ठांसमोर खुशमस्करी करण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात; परंतु हे लोक कायदा व सुव्यवस्था काळात रस्त्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिसून येत नाही, अशा गंभीर स्थितीत पोलिसांचे हातात हात घालून काम करणारे अनेक शांतीदूतांना या समितीमधून हद्दपार करण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी कागदोपत्री यादीवरून नाराजीचा सूर उमटत आहे. शांतता समिती ही लोकांना खुश करण्यासाठी नव्हे तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही यादी कोणाच्या सांगण्यावरून तयार करण्यात आली! वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना का डावलण्यात आले. यादीत सदस्यांची निवड करताना राजकीय हस्तक्षेप झाला का? कोणाच्या दबावाखाली ही यादी तयार करण्यात आली का, समिती सदस्य निवडीकरिता कोणते निकष लावण्यात आले, आदी गंभीर प्रकारांची चौकशी शहरातील शांततेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करणे गरजेचे झाले आहे.
शांतता समिती सदस्य यादी
पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, आ. प्रकाश भारसाकळे, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, अॅड. अतुल सोनखासकर, राजेश नागमते, अॅड. ब्रिजमोहन गांधी, अॅड. अंजूम काजी, सुरेश अग्रवाल, दीपक अग्रवाल, अॅड. मनोज वर्मा, शेख ख्वाजा अ. रशीद, डॉ. प्रमोद चोरे, कदीर शा वजीर शा, जावेद अली मीरसाहेब, मोहम्मद फारूक अब्दुल अकबाणी, मो. नुरज्जमा मो. आदिल, विवेक बोचे, पुरुषोत्तम चौखंडे, सिद्धेश्वर बेराड, रामचंद्र बरेठिया, अश्विन पितांबरवाले, सुभाष तेलगोटे, भरत मनियार, संजय विरवाणी, प्रा. प्रकाश गायकी, कैलास गोंडचर कैलास गोंडचर यांचा समावेश आहे