दोन महिन्यांतील १९ दिवसांत ‘अवकाळी’चा तडाखा; उन्हाळ्यातील कहर थांबेना
By संतोष येलकर | Published: May 4, 2023 03:15 PM2023-05-04T15:15:47+5:302023-05-04T16:03:19+5:30
जिल्ह्यातील घरांची पडझड, पीक नुकसानीचा आलेख
अकोला : कडाक्याच्या उन्हाळ्यात गेल्या दोन महिन्यांतील (एप्रिल अखेरपर्यंत) १९ दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर अद्यापही थांबला नसल्याने, ‘अवकाळी‘च्या तडाख्यात जिल्ह्यातील घरांची पडझड आणि पिकांच्या नुकसानीचा आलेख वाढतच असल्याचे वास्तव आहे. यंदाचा उन्हाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभापासूच सूर्य आग ओकू लागला होता.
जिवाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हाच्या दिवसांत प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना, वातावरणात अचानक बदल झाल्याने गेल्या मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सुरू झाला. ३० एप्रिलपर्यंत गेल्या दोन महिन्यांतील १९ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात घरांची पडझड आणि पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. कडाक्याच्या उन्हाच्या दिवसात वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या अवकाळी पावसाचा कहर अद्यापही सुरूच असल्याने, जिल्ह्यातील नुकसानीचा आलेखही दरदिवसाला वाढतच असल्याचे चित्र आहे.
दोन महिन्यांतील १९ दिवसांत असा बरसला अवकाळी पाऊस!
गेल्या मार्च व एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत १९ दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस बरसला. त्यामध्ये ६ ते ७ मार्च रोजी जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात, १५ ते १९ मार्च या कालावधीत बार्शिटाकळी, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांत, ३१ मार्च रोजी बार्शिटाकळी व पातूर तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. एप्रिल महिन्यात ७ ते ९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात, २६ ते २७ एप्रिल दरम्यान पातूर व बार्शिटाकळी तालुक्यांत आणि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत अकोट, मूर्तिजापूर आणि बार्शिटाकळी या तीन तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला.
१६,८५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान !
वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १६ हजार ८५७ हेक्टर ५५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये गहू, कांदा, टरबूज, पपई, निंबू, भुईमूग, मका, हरभरा व भाजीपाला इत्यादी पीक नुकसानीचा समावेश आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.