अवकाळी पावसाचा ६३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका! ८३२ गावांमध्ये झाले नुकसान
By रवी दामोदर | Published: December 9, 2023 05:42 PM2023-12-09T17:42:19+5:302023-12-09T17:42:33+5:30
अकोला जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले.
अकोला : जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू असून, सात तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात संयुक्त पंचनामे सुरू असून त्यानंतर अंतिम प्रस्ताव शासनाला मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे.
यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने खरीप हंगामात पेरण्या उशिराने झाल्या. त्यात शेतात पीक बहरलेले असताना तब्बल दीड महिना पावसाने खंड दिल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पेरणी केली, परंतु दि. २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून जिल्ह्यात सलग पाच दिवस अवकाळीने धुमाकूळ घातला. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कापसासह हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुसरीकडे सकाळच्या धुक्यामुळे तुरीला फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात दि.२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत सातही तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहे. सध्या जिल्ह्यात पंचनामे सुरूच असून, अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.
सातही तालुक्यात नुकसान
जिल्हा प्रशासनानुसार सुरुवातीला केवळ तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी व अकोला तालुक्यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला होता. परंतु आता अकोट, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यातसुद्धा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
८३२ गावांना बसला फटका
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीचा जिल्ह्यातील तब्बल ८३२ गावांना फटका बसला आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील ३५ गावे, बार्शीटाकळी तालुक्यातील १६० गावे, मूर्तिजापूर तालुक्यातील १६६ गावे, अकोट तालुक्यातील १८६ गावे, तेल्हारा तालुक्यातील ७८ गावे, बाळापूर तालुक्यातील ११३ गावे, पातूर तालुक्यातील ९४ गावांचा समावेश आहे.