अकोला जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस
By रवी दामोदर | Published: May 18, 2024 09:21 PM2024-05-18T21:21:34+5:302024-05-18T21:21:52+5:30
केळीसह ज्वारी पिकाचे नुकसान : काही भागात गारपीट.
अकोला : जिल्ह्यात शनिवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही गावात गारपीट झाली. यामध्ये घर, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार, सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अकोटात चांगला पाऊस बरसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे काही भागात वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी प्रखर ऊन तापल्यानंतर दुपारी अचानक वातावरणात बदल झाला व जोरदार वादळ आले. धुळीचे लोट उडाले, मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. वादळात काही घरावरील टिनपत्रे उडाली. अकोट तालुक्यातील अनेक गावात गारपीटचा तडाखा बसला. ग्रामीण व शहरी भागात आकाशात टीनपत्रे उडून जाताना दिसून येत होते. या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
--------------------------------
तेल्हारा तालुक्यात ज्वारी पिकाची नासाडी
तेल्हारा तालुक्यात मागील आठवड्यापासून तीन वेळा वादळ वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा वादळवाऱ्यासह पावसाने चांगलेच नुकसान झाले. तालुक्यातील वरुड बिहाडे, राणेगाव भोकर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी पिकाचे नुकसान झाले.
--------------------------------
रुईखेड परिसरात केळी पिकांचे नुकसान
अकोट तालुक्यातील रुईखेड परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले. उभी केळी पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
-----------------------------------
वरूर जऊळका येथे तासभर पाऊस
वरूर जऊळका : खारपाणपट्ट्यातील वरूर जऊळका येथे १८ मे रोजी दुपारी विजेच्या कडकडाटात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सतत तासभर रिमझिम पाऊस सुरू होता. शनिवारी गावातील बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेते, ग्राहकांची तारांबळ उडाली होती. तसेच नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सावरा विद्युत केंद्राअंतर्गत येणाऱ्या या गावांमध्ये थोडा फारही पाऊस आला तर विद्युत पुरवठा बंद पडतो. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागतो.