जिल्ह्यात अवकाळी पाऊस; पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:48+5:302021-03-21T04:17:48+5:30
अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यापावसात मुर्तिजापूर तालुक्यातील भाजीपाला, कांदा आणि उन्हाळी तीळ ...
अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यापावसात मुर्तिजापूर तालुक्यातील भाजीपाला, कांदा आणि उन्हाळी तीळ पिकाचे नुकसान झाले, तर इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पिकांना फटका बसला. शनिवारीदेखील सायंकाळच्या सुमारास अकोला शहरासह मुर्तिजापूर, बार्शिटाकळी, पातूर आणि बाळापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही निदर्शनास आले. अकोला शहरातही काही भागात गारपीट झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले, याचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
मुर्तिजापूरात ७.३ हेक्टरवर नुकसान
शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे मुर्तिजापूर तालुक्यात ७.३ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये कांदा, उन्हाळी तीळ आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारीदेखील अवकाळी पावसामुळे तालुक्यातील इतरही भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.
डाबकी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू
शुक्रवारी वादळवाऱ्यासह झालेल्या पावसानंतर शुक्रवारी रात्री उशिरा डाबकी परिसरात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात गारपीट
जिल्ह्यातील बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात शनिवारी अवकाळी पावसासोबतच गारपीटही झाली. बाळापूर तालुक्यातील वाडेगावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कृषी विभागाच्या सर्वेक्षणानंतरच नुकसानाचा आकडा समोर येणार आहे.
शुक्रवारी झालेल्या पावसात मुर्तिजापूर तालुक्यात ७.३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये भाजीपाला, कांदा आणि तीळ पिकांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले हे सर्वेक्षणानंतरच समोर येईल.
- डॉ. के.बी. खोत, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला