अवकाळी पावसाचा पिकांना दणका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:23 PM2020-03-01T18:23:52+5:302020-03-01T18:23:58+5:30
अवकाळी पावसाने दणका दिला असून, गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अकोला : जिल्ह्यात गारपीट, सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने दणका दिला असून, गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजल्याने शेतकरी संकटात सापडला. अकोला शहरातही जोरदार पाऊस बरसल्याने लघू व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली.
यावर्षी सतत पाऊस सुरू राहिल्याने मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हरभरा, गव्हाची पेरणी केलेली आहे. हरभरा पीक सोंगणीला आले असून, जवळ जवळ ८० टक्के शेतक ºयांनी हरभरा काढला असून, शेतात गंजी मारून ठेवला आहे. रविवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उघड्यावर असलेले हरभरा पीक भिजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे हरभरा काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेतात वेचणीला आलेला कापूसदेखील भिजला आहे. गहू, कांदा आणि तूर पीकही भिजल्याने या भागातील शेतकºयांना आणखी एका नव्या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी शेती मशागत, पेरणी, बी-बियाणे खरेदी व आंतरमशागतीची कामे यासाठी केलेला खर्चदेखील भरून निघणार नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.