मूर्तिजापुरातील कोविड केअर सेंटरमधील खाटांवर बेवारस श्वानांचा आराम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:42 AM2020-07-20T10:42:58+5:302020-07-20T10:43:35+5:30
येथील खाटांवर बेवारस कुत्र्यांचा वावर असून, रुग्णांच्या खाटांवर कुत्रे आराम करीत असल्याची गंभीर बाब रविवारी समोर आली आहे.
- संजय उमक
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संदिग्ध रुग्णांना दाखल करण्यात येते. या ठिकाणी रुग्णांना पोषक वातावरण, सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, असा नियम आहे; परंतु मूर्तिजापुरातील हेंडज कोविड केअर सेंटर असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. येथील खाटांवर बेवारस कुत्र्यांचा वावर असून, रुग्णांच्या खाटांवर कुत्रे आराम करीत असल्याची गंभीर बाब रविवारी समोर आली आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांना शुद्ध पाणी, स्वादिष्ट जेवणासोबतच प्रसन्न वातावरण असणेही गरजेचे आहे आणि या सर्व सुविधा स्थानिक प्रशासनाने पुरविणे बंधनकारक आहे; परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मूर्तिजापुरातील हेंडज शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीमधील कोविड केंअर सेंटरची दुरवस्था झाली असून, येथील खोल्यांची खिडक्या, दारे तुटलेली आहेत. शौचालय, स्वच्छतागृहांमध्ये घाण साचली आहे. रुग्णांना दिलेल्या खोल्यांमधील खाटांवर बेवारस कुत्री आराम करीत असल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
सेंटरमध्ये विविध समस्या असून, ठिकठिकाणी अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे येथे क्वारंटीन असलेले संदिग्ध रुग्ण कासावीस झाले आहेत. अस्वच्छ वातावरणात त्यांना येथे राहावे लागत असल्याने, अनेकांनी सुविधेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या ठिकाणी संदिग्ध रुग्णांची प्रकृती बरी होण्याऐवजी येथील दूषित वातावरणामुळे आणखी बिघडण्याची शक्यता आहे. येथील खोल्यांची दारे, खिडक्या तुटलेल्या असल्यामुळे येथील महिला रुग्ण व पुरुषांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने कोविड केंअर सेंटरची पाहणी करून या ठिकाणी स्वच्छतेसह सुविधा रुग्णांना पुरविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णांनी केली आहे.
क्वारंटीन असलेल्या काही लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले. त्यात तथ्य नाही. रविवारी सकाळी हेंडज क्वारंटीन सेंटरला भेट दिली असता, सर्व सुविधा असल्याचे रुग्णांनी सांगितले. सर्व सुविधा रुग्णांना दिल्या जात आहेत. दररोज क्वारंटीन कक्षाची स्वच्छता करण्यात येते.
- प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर
हेंडज कोविड केअर सेंटरमध्ये अस्वच्छता आहे. बेवारस कुत्रे खोल्यांमध्ये घुसत आहेत. या ठिकाणी प्रशासनाने संदिग्ध रूग्णांना सुविधा पुरविण्याची गरज आहे. याबाबत विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
-राजेंद्र मोहोड, सामाजिक कार्यकर्ते