पणज परिसरात गारपिटीसह अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:53 AM2021-02-20T04:53:43+5:302021-02-20T04:53:43+5:30
पणज : अकोट तालुक्यातील पणज परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळवाऱ्यासह ...
पणज : अकोट तालुक्यातील पणज परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळवाऱ्यासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पणज परिसरातील बोचरा, शहापूर, गौरखेड, नर्सिंगपूर, वाघोडा, अकोली जहागीर, दिवठाना, रुईखेड शेतशिवरात वादळवाऱ्यासह पाऊस पडल्याने केळी, हरभरा, गहू, कांदा, संत्रा, भाजीपाला, पानपिंपरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खरीप हंगामात अतिपाऊस व परतीच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, कपाशी पिकांचे नुकसान झाले होते. तसेच गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह पावसाने केळीच्या बागेची पाने फाटली, तर काही ठिकाणी गारांचा मार लागल्याने पीक जमीनदोस्त झाले. नुकसानग्रस्त भागात पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पावसाळ्यात शहापूर बृहत प्रकल्पातील बॅक वाॅटरमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते; मात्र अद्यापही मोबादला मिळाला नसल्याने शेतकरी संकटात आहेत. तसेच आता झालेल्या गारपीटने शेतकरी हवालदिल झाला आहे. (फोटो)