दानापूर येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:15 AM2021-06-04T04:15:47+5:302021-06-04T04:15:47+5:30
दानापूर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदा काही प्रमाणात मान्सून पूर्व कपाशीची लागवड करण्यात आली. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना, झालेल्या पावसाने दिलासा ...
दानापूर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदा काही प्रमाणात मान्सून पूर्व कपाशीची लागवड करण्यात आली. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना, झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असला तरी, वादळ वारा व अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र, मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागामधील केळीची झाडे वाकली आहेत तर काही झाडे तुटून पडली आहे. अचानक आलेल्या वादळ वारा व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून विद्युत खांबांवरील अडकली आहे. वादळ वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने, विजेचे खांब वाकले आहेत. त्यामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी एस.एम. दारोकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन तास परिश्रम घेऊन गावातील वीजपुरवठा सुरळीत केला.
फोटो :
वृक्ष उन्मळून पडल्याने, रस्ता बंद
दानापूर- माळेगाव झाडे उन्मळून पडल्याने रस्ता सुद्धा बंद झाला आहे. वादळ वाऱ्यामुळे केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी शेतकरी करीत आहेत.