पातुर तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:18 AM2021-03-21T04:18:19+5:302021-03-21T04:18:19+5:30
शनिवारी सायंकाळी पाच वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने सहा ते सातच्या दरम्यान रौद्र रूप धारण केलं. प्रचंड सोसाट्याचा वारा मेघगर्जना ...
शनिवारी सायंकाळी पाच वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने सहा ते सातच्या दरम्यान रौद्र रूप धारण केलं. प्रचंड सोसाट्याचा वारा मेघगर्जना मुसळधार पावसासोबत १० गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे लिंबू, हरभरा,गहू, आंबा, फुलवर्गीय पिके काकडी ,मका, भुईमुग, सह इतर पिके मिळून तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील लेमन विलेज व्हिलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवरासह अनेक गावांमधील लिंबू गारपिटीमुळे पूर्णतः गेला आहे. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे नुकसान झालं होतं. अस्मानी संकटामुळे आम्हा शेतकऱ्यांवर फार माेठे ओढवल्याचे उपसरपंच अमर पजई यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई सोबतच विशेष शेतकरी पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख यांनी केली आहे. तहसीलदार दीपक बाजड तालुका कृषी अधिकारी डी. एस. शेटे यांनी रविवारी तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना गावागावांमध्ये जाऊन प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.