जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:18 AM2021-04-15T04:18:00+5:302021-04-15T04:18:00+5:30
अकोला : जिल्ह्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारी हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह ...
अकोला : जिल्ह्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारी हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला असून, वादळवाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला वर्गीय पिकांना बसला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, रविवार व सोमवारी काही भागात हलक्या स्वरूपात सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने वादळवाऱ्यासह हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. या पावसामुळे साथरोग वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व अवकाळी पाऊस या दुहेरी संकटामुळे सामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास ३० मिनिटे ते एक तास वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारांसह झालेल्या पावसाने शहर आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग झोडपून काढला. मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.
------------------------------
या भागात अवकाळी पावसाची हजेरी
जिल्ह्यतील ग्रामीण भागात बुधवारी वादळ वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये पातूर, बाभूळगाव, आलेगाव, लोहारा, तेल्हारा शहर व तालुका, पंचगव्हाण, मूर्तिजापूर, विवरा, बेलखेड आदी भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच पातूर तालुक्यातील मळसूर येथे काही प्रमाणात गारपीट झाली.
---------------------------
वणी वारुळा परिसरात पिकांचे नुकसान
अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून, परिसरातील आंबा, कांदा, गहू व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे मत वणी येथील शेतकरी भगीरथ पोटे, सोनबर्डी येथील बाळू पाटील आवारे यांनी व्यक्त केले.
------------------------------
मळसूर परिसरात गारपीट
पातूर तालुक्यातील मळसूरसह परिसरात बुधवारी गारपीटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कांदा, केळी, उन्हाळी मूग, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. फळबाग, लिंबू, आंबा आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गत दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.