जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:25+5:302021-05-17T04:17:25+5:30
--------------------------------------------------- बांबर्डा येथे जोरदार पाऊस रोहनखेड : अकोट तालुक्यातील बांबर्डा येथे रविवार, दि. १६ मे रोजी सायंकाळ ५ वाजताच्या ...
---------------------------------------------------
बांबर्डा येथे जोरदार पाऊस
रोहनखेड : अकोट तालुक्यातील बांबर्डा येथे रविवार, दि. १६ मे रोजी सायंकाळ ५ वाजताच्या सुमारास वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळवाऱ्यामुळे शेतकरी मधुकर खंडारे यांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेली होती. त्यामुळे घरामधील धान्य शेतीसाठी आणलेले खताचे पोते भिजल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. शासनाने घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुसकान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
--------------------------------------
पारस येथे वीजबत्ती गुल
पारस : बाळापूर तालुक्यातील पारस येथे वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळ वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती. पावसाला सुरुवात होताच गावातील वीज गुल झाली होती. वीज निर्मिती केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चारचाकी व दुचाकी गाडीसाठी उभारलेल्या टीनशेडवरील टीनपत्रे उडाली होती. पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
-------------------------------------------
बार्शीटाकळी तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा!
बार्शीटाकळी : तालुक्यातील ग्रामीण भागाला रविवार, दि.१६ मे रोजी सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. धाबा परिसरात कडुलिंबाची झाड विद्यत तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. घरावरील टीनपत्रे उडून गेली. सध्या शेतकरी शेतातील भुईमूग पिकांची काढणी करीत आहे. या चक्रीवादलामुळे शेतकऱ्यांची दाणादाण झाली.
---------------------------------
गायगाव येथे टीनपत्रे उडाली
गायगाव : रविवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरात पाऊस कमी व वादळ वारा वाहत होता. वादळ वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली होती. तसेच काही घरांची पडझड झाली. येथील श्री शंकर संस्थान समोरील झाडाची फांदी तूटून वीज तारांवर पडल्याने गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
-------------------------------