आज अकोट बंद
By Admin | Published: May 23, 2017 12:55 AM2017-05-23T00:55:42+5:302017-05-23T00:55:42+5:30
सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याचा निषेध; विविध संघटनांचे एसडीओंना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: प्रबोधनकार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महाराजांना पोलीस संरक्षण देण्याबाबतचे निवेदन २२ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. विविध संघटनांनी महाराजांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईकरिता आज २३ मे रोजी अकोट शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई येथील नायगाव दादर परिसरात कार्यक्रम संपल्यानंतर सत्यपाल महाराज यांच्यावर कुणाल जाधव याने चाकूने जीवघेणा हल्ला केला. महाराज गंभीर जखमी झाले, कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेने महाराजांचे प्राण वाचले.
हा जीवघेणा हल्ला पाहता महाराजांचा खून करण्याचा कुणाल जाधव याचा हेतू असल्यामुळे त्याच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व प्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने होण्याकरिता पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
सदर निवेदन शहरातील विविध पुरोगामी विचाराच्या संघटना, सामाजिक संस्था यांनी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दिले.