उपवर मुली म्हणतात... शेतकरी नवरा नको गं बाई...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:55+5:302021-03-18T04:17:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला: समाजात पूर्वी आईवडिल जे ठरवतील त्याच मुलीशी किंवा मुलाशी विवाह जोडला जात होता. मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: समाजात पूर्वी आईवडिल जे ठरवतील त्याच मुलीशी किंवा मुलाशी विवाह जोडला जात होता. मात्र यामध्ये कालांतराने बदल झाला असून, आता मुलींच्या मागण्या वाढल्या आहेत. मुलींना शेतकरी नवरा नको असून, नोकरदाराला पसंती अधिक दिल्या जात असल्याची माहिती विवाह नोंदणी केंद्रातून मिळाली आहे. नोकरदारामध्ये डॉक्टर, अभियंता किंवा बड्या पदावर कार्यरत असलेला मुलगाच नवरा म्हणून हवा असल्याचे उपवर मुलींकडून सांगण्यात येत असल्याची माहिती आहे.
दरवर्षी दिवाळी नंतर विवाह जुळविण्याच्या कामास सुरूवात होते. अनेक उपवर तरुण - तरुणींचे विवाह जुळविताना अडचणी निर्माण होत आहेत. विवाह जुळविणाऱ्या वर-वधू सूचक मंडळांकडे मध्यस्थांमार्फत विशेषत: तरुणांचे ‘बायोडाटा’ जमा होत आहेत. मात्र, विवाहोत्सुक मुलींसह त्यांच्या पालकांच्याही अपेक्षा वाढल्याने त्यांना हवा तसा जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी व शेतात काम करणाऱ्या मजुरांना तर हल्ली ‘डिमांड’च नसल्याची एकंदरित स्थिती आहे. मुलीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असल्यास तिला शक्यतो पुणे, मुंबईत गलेलठ्ठ नोकरी असलेलाच नवरा हवा आहे; तर डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली व त्यांचे पालक डॉक्टरच शोधत आहेत. शासकीय, निमशासकीय नोकरी करणाऱ्यांनाही यामुळे विवाह जुळविताना अडचण निर्माण झालेली आहे.
---------------------------------------------
वर-वधूंचे विवाह जुळवून देण्याकरिता अपेक्षित सर्व प्रयत्न केले जातात. मुलांच्या तुलनेत आता मुलींकडून अधिक अटी ठेवल्या जात आहेत. सद्यस्थितीत नोकरदार मुलांना अधिक पसंती दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
- सदानंद तायडे, उपवर-वधू सूचक मंडळ, पातूर.
--------------------------------
समाजात उच्च शिक्षित मुलींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेले आहे. त्यांना त्यांच्याप्रमाणेच शिकलेला व चांगल्या पगाराच्या नोकरीवर असलेलाच नवरा हवा आहे. त्यात गैर नाही. मात्र, यामुळे कमी शिकलेल्या व साधी नोकरी असलेल्या मुलांचे विवाह जुळणे अशक्य झाले आहे.
- आत्माराम जाधव, अकोला.
---------------------------------
सर्वाधिक मागणी डॉक्टर, अभियंत्यांना
गेल्या काही वर्षांत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच पालकांकडून खुली सूट मिळत असल्याने बहुतांश मुलींनी परगावी जाऊन डॉक्टर, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.
त्यापैकी ज्या मुलींचे विवाहाचे वय झाले, त्यांच्यासाठी वराचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, डॉक्टर किंवा अभियंताच आणि तोदेखील चांगल्या पॅकेजचा, अशी अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी, शेतमजूरच नव्हे; तर शासकीय व निमशासकीय नोकरी करीत असलेल्या विवाहोत्सुक वराला डॉक्टर किंवा अभियंता मुलगी मिळणे पूर्णत: अशक्यच झालेले आहे.
--------------------------
अटी मान्य असतील तरच बोला...
पूर्वी वधू मुलीसाठी योग्य वर शोधण्याचे संपूर्ण अधिकार पालकांनाच असायचे. पालक म्हणतील त्या मुलासोबत मुलीला विवाह करावा लागत असे. विशेषत: घरी शेती किती आहे आणि ती ओलिताखालची आहे किंवा कोरडवाहू, हे पाहिले जायचे. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. शक्यतो शेतकरी नवरा कुणालाच नको आहे. काही मुलींकडून तर एकत्रित कुटुंबही नको आहे. मुलगा मुंबई, पुण्यात राहायला हवा. अशा अटी मान्य असतील तरच पुढची बोलणी होत असल्याचेही प्रकार घडत आहेत.