येणारा काळ विदर्भातील खेळाडूंचा! - सुलक्षण कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 10:34 AM2020-12-20T10:34:55+5:302020-12-20T10:35:38+5:30
Cricket in Vidarbha असे मत माजी रणजीपटू व मुंबई येथील प्रसिद्ध प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
अकोला : क्रिकेटमध्ये विदर्भातील खेळाडू झपाट्याने प्रगती करीत आहे. सुरुवातीच्या काळापासूनच बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यातील क्रिकेटपटू प्रगती करीत असून, नावलौकिक मिळवत आहेत. विदर्भातील क्रिकेट खेळाडूंकडे गुणवत्तेची कमी नाही त्यामुळे येणारा काळ हा विदर्भातील खेळाडू नक्की गाजविणार, असे मत माजी रणजीपटू व मुंबई येथील प्रसिद्ध प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
अकोला व क्रिकेट याकडे कसे बघता?
अकोला व क्रिकेटचे नाते घट्ट आहे. अकोल्यातून अनेक प्रतिभावान खेळाडू रणजीमध्ये खेळलेले आहेत. येथील खेळाडूंमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. परिसरात क्रिकेटचे अनेक हिरे दडलेले असून, त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा देऊन निखारायची गरज आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
अकोल्यातील धावपट्टी व मैदाने कसे आहेत?
अकोल्यातील मैदानांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मैदानांची निगा राखण्याची जबाबदारी ज्या संघटनांकडे आहे, त्यांनी मैदाने साफ करणे गरजेचे आहे. चांगल्या मैदानांशिवाय उत्कृष्ट खेळाडू घडत नाही. त्यामुळे मैदाने चांगली असणे अधिक महत्त्वाचे आहे.
अकोल्यात क्रिकेट प्रामुख्याने टेनिस बॉलवर खेळले जाते. त्यामुळे येथील खेळाडू लेदर बॉलवर खेळताना अडचणीत येऊ शकतात, त्यावर उपाय सुचवा.
टेनिस क्रिकेट व लेदर बॉल क्रिकेटमध्ये काहीही फरक नाही. उलट टेनिस बॉलने क्रिकेट खेळल्याने खेळाडूला लेदर बॉल क्रिकेटमध्ये फायदाच होता. विशेषत: फलंदाजांना याचा चांगला फायदा होतो.
क्रीडा क्षेत्रावर कोरोनाचा काय परिणाम झाला?
कोविड-१९ चा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये विशेषत: क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. कोविड-१९ संसर्गजन्य असल्याने अनेक खेळाडूंचा सराव बंद झाला आहे. त्याचा फिटनेसवर परिणाम झाला. स्पर्धांचे आयोजन रद्द झाल्याने त्यांच्यामधील गुणवत्तेवरही परिणाम झाला. सध्या अनलॉक प्रक्रियेत खेळाला अटी व शर्थींनुसार मंजुरी मिळाली आहे. खेळाडू हा जिद्दी व परिश्रमी असतो. तो लवकरच तयारी करू शकतो.
अकोल्यात भविष्यात स्पर्धा भरविण्यासाठी तांत्रिक, मूलभूत अडचणी कशा दूर होतील?
अकोलेकर खेळाडूंमध्ये गुणवत्तेची कमी नाही; मात्र येथील मैदाने पाहून खूप वाईट वाटले. भविष्यात स्पर्धा भरविण्यासाठी सर्वप्रथम मैदाने चांगली करणे आवश्यक आहेत. त्यासाठी ज्या क्लबकडे जबाबदारी आहे, त्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे बजावणे गरजेचे आहे.
महिला क्रिकेटसाठी काय प्रयत्न कराल?
मी अकोल्यात खूप मोठे व्हिजन घेऊन आलो आहे. विदर्भातील क्रिकेटचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. येथील खेळाडूंमध्ये खूप प्रतीभा असून, ओळखणे गरजेचे आहे. वऱ्हाडात महिला क्रिकेट फार कमी खेळले जाते. मी त्या अनुषंगाने विशेष प्रयत्न करणार असून, यासाठी मी शालेय स्पर्धा आयोजित करण्यावर भर देणार आहे.
खेळाडूंसाठी काय सल्ला द्याल?
येणारा काळ हा विदर्भातील खेळाडूंचा आहे. त्यामुळे येथील खेळाडूंनी परिश्रम, जीद्द व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सराव ठेवणे गरजेचे आहे. जर खेळाडू हिरा असेल, तर तो नक्कीच चमकणार. मात्र त्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.