सुधारीत बातमी: चाचण्यांचे प्रमाण वाढले: पाच दिवसांत ४ हजार ५९३ चाचण्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:33 AM2020-12-13T04:33:13+5:302020-12-13T04:33:13+5:30
कोरोनाचा संभाव्य धोका पाहता शासनाने कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, आरटीपीसीआरच्या ७५ टक्के, तर रॅपिड अँटिजेनच्या ...
कोरोनाचा संभाव्य धोका पाहता शासनाने कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, आरटीपीसीआरच्या ७५ टक्के, तर रॅपिड अँटिजेनच्या २५ टक्के चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात सुपर स्प्रेडर व्यक्तींसह इतर संदिग्ध रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. त्यामुळे कोरोना चाचण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, गत पाच दिवसांतच ४ हजार ५९३ चाचण्या झाल्यात. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण जास्त आहे. दिवाळीपूर्वी रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण लक्षणीय होते.
लक्षणे असणाऱ्या संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या जास्त
कोविड चाचण्यांतर्गत ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत, अशा संदिग्ध रुग्णांच्या रॅपिड अँटिजेनसह आरटीपीसीआर चाचण्याही केल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे चाचण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
पाच दिवसांतील चाचण्यांमध्ये ९६.३ टक्के रुग्ण निगेटिव्ह
गत पाच दिवसांत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये १७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. म्हणजेच एकूण चाचण्यांच्या ३.७० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ९६.३ टक्के लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवालांचे प्रमाण जास्त असून हे अकोलेकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
आरटीपीसीआर चाचण्यांवर जास्त भर दिला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने लक्षणे असणाऱ्या संदिग्ध रुग्णांसह सुपर स्प्रेडर व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे. लक्षणे आढळताच नागरिकांनी कोविड चाचणी करून वेळेत उपचार घ्यावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला