चढ-उतारातूनच आयुष्य समृद्ध होते- सावजी
By admin | Published: September 5, 2016 02:48 AM2016-09-05T02:48:58+5:302016-09-05T02:48:58+5:30
जीवनातील अनुभवातून जिवन अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन डॉ. अविनाश सावजी यांनी केले.
अकोला, दि. ४ : कधी काळी जेव्हा सायकलीने फिरायचो तेव्हा मार्गावर अनेक ठिकाणी चढ-उतार अनुभवाला यायचे. चढाव आला की जोर लावून पायडल मारायचो, त्यानंतर उतार आला की, हायसे वाटायचे. याचे तेव्हा काही नवल नव्हते; मात्र आता त्या चढ-उताराचे महत्त्व जाणवते. मार्गातील चढ-उताराच्या अनुभवातून धडे मिळतात, आयुष्य अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन प्रयास सेवा अंकुर या अमरावती येथील सामाजिक संस्थेचे संचालक डॉ. अविनाश सावजी यांनी केले. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित प्रख्यात अस्पायर शैक्षणिक संस्थेच्या आठव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. दुसरे प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष पी.नाथ दंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ऐश्वर्या सहस्त्रबुद्धेच्या स्वागत गीताने झाली. अल्पावधीतच अकोल्यातून देश-विदेशात कीर्ती मिळविलेल्या अस्पायरची माहिती संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे यांनी प्रास्ताविकतेतून दिली. अस्पायरमध्ये सवरेत्कृष्ट सिद्ध झालेल्या १६ विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वर्षातील सवरेकृष्ट विद्यार्थिनी प्रशांती बाठी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. सावजी म्हणाले की, आयुष्यातील चढ-उताराला घाबरण्यापेक्षा त्यातून धडा घेत घडले पाहिजे. ओक हॉल उभे राहण्यासाठीदेखील जागा नव्हती, एवढी गर्दी झाली होती. कॅन्सर पीडित शहादीदी नामक गरजवंत महिलेसाठी स्वत:च्या खिशातून साडेतीन लाख रुपये खर्च करणारे डॉ.पी. नाथ दंदी यांनी भाषणातून पर्यावरणावपर भर दिला. वनराईच्या उपक्रमाची माहितीही त्यांनी येथे दिली. रुग्णसेवेतून माणसे जोडण्याची माहितीही त्यांनी येथे दिली. जीवनाचे विचार सकारात्मक करण्याच्या दिशेने प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अस्पायरचे कौतुक केले. आत्महत्या होत असलेल्या या परिसरात नवी उमेद निर्माण करण्याचे कार्य अभिमानास्पद आहे. अशैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणार्या या संस्थेने सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास पेरण्याचे कार्य केले, असे ते म्हणालेत. कार्यक्रमात अस्पायरच्या आठ वर्षातील बुलेटीनच्या वाचनातून संस्थेच्या प्रगतीच्या टप्प्यांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा कुळकर्णी आणि रोशनी जेठानी यांनी केले.