उडीद, मुगाच्या उत्पादनात घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:51 AM2017-10-06T01:51:05+5:302017-10-06T01:51:33+5:30
बोरगाव वैराळे : बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात यावर्षी उडीद, मूग या पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन न झाल्यामुळे शेतकर्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, पेरणी, डवरणी, निंदण, फवारणी, कापणी, मळणी यासाठी केलेला खर्चदेखील निघत नाही. यासोबतच मूग, उडिदाला भाव नसल्यामुळे शेतकर्यांना फायदा करण्यापेक्षा नुकसान करणारे ठरल्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव वैराळे : बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात यावर्षी उडीद, मूग या पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन न झाल्यामुळे शेतकर्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, पेरणी, डवरणी, निंदण, फवारणी, कापणी, मळणी यासाठी केलेला खर्चदेखील निघत नाही. यासोबतच मूग, उडिदाला भाव नसल्यामुळे शेतकर्यांना फायदा करण्यापेक्षा नुकसान करणारे ठरल्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
बोरगाव वैराळे परिसरात शेतकर्यांनी प्रतिएकरी पेरणीपूर्व मशागतीसाठी एक हजार, बियाणे खरेदीसाठी एक हजार, पेरणीसाठी एक हजार, डवरणी दोनदा एक हजार, निंदण ५00 रुपये, दोनदा कीटकनाशक फवारणी एक हजार, पीक कापणी प्रतिएकर १५00 रुपये, मळणी प्रतिक्विंटल ५00 रुपये असा प्रतिएकराला आतापर्यंत साडेसात हजार रुपये खर्च आला असून, प्रतिएकरात मूग, उडिदाचे पीक एक क्विंटलपेक्षा जास्त झाले नाही. जे पीक झाले, तेदेखील कापणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे रंगहीन झाले व पांढर्या रंगाचे झाल्यामुळे विक्रीसाठी घेऊन गेल्यानंतर बाजार समितीमधील खासगी व्यापारी दोन हजार रुपये क्विंटलने मागत असल्यामुळे झालेल्या उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणे तर सोडाच, उलट शेतकर्यांना प्रतिएकरी पाच हजार रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शासनाने हमी भावाने मूग, उडीद खरेदी करणे सुरू केले असले तरी शेतात उत्पादित झालेले अत्यल्प मूग, उडीद विक्रीसाठी घेऊन जाणे लहान शेतकर्यांना परवडत नाही. या परिस्थितीचा फायदा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खासगी व्यापारी या सर्व छोट्या-मोठय़ा शेतकर्यांची आर्थिक लूट करीत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने हमीभावापेक्षा कमी भावाने मूग, उडिदाची खरेदी करणार्या खासगी व्यापार्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांचा माल आल्यानंतर त्या मालाचे सॅम्पल खरेदीदाराकडे पाठविण्यात येते व ते खरेदीदार व्यापारी शेतकर्यांच्या मालाचे भाव ठरवितात. यावर शासनाने ठरविलेल्या हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याबाबत कुठलेही बंधन नसल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते.
- अरुण गावंडे
अडतदार, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला
मूग, उडिदाची हमी भावापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याचा प्रकार म्हणजे व्यापार्यांकडून शेतकर्यांची सामूहिक लूट करण्याचा प्रकार असून, याकडे शेतकर्यांचे हित जोपासण्यासाठी निर्माण झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळाची डोळेझाक म्हणजे एकप्रकारे व्यापार्यांना गैरप्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
- विजय पाटील
संचालक सेवा सहकारी संस्था, हातरुण
मूग, उडिदाच्या पिकांमध्ये शेतकर्यांना प्रति एकराला पाच ते सहा हजार रुपये तोटा सहन करावा लागला व बाजारात या पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत भरच पडली असल्याने मूग, उडीद पेरणी करणार्या शेतकर्यांना पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यात यावी.
- सुनील वैराळे, शेतकरी