उर्दू माध्यम ५३, प्राथमिकच्या ११ शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:04 PM2018-12-07T13:04:32+5:302018-12-07T13:05:46+5:30
जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या ५३ आणि प्राथमिकच्या ११ अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिली.
अकोला: शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातर्फे मंगळवारी मराठी माध्यमाच्या ६२ शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या ५३ आणि प्राथमिकच्या ११ अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिली.
जिल्ह्यात मराठी माध्यमाचे ६३ आणि उर्दू माध्यमाचे ६३ असे एकूण १२६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या संचमान्यता पडताळणी, सेवाज्येष्ठतेनुसार १२६ अतिरिक्त शिक्षकांमधील १७ शिक्षकांचे यादीतून नाव कमी झाल्यामुळे ही संख्या १0९ वर आली होती. यातही पुन्हा शिक्षकांच्या हरकती, आक्षेपांवर सुनावणी घेत, शिक्षणाधिकारी मुकूंद यांनी अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्याच शाळेतील रिक्त पदांवर पदस्थापना दिली. त्यामुळे मराठी माध्यमाच्या ६२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. उर्दू माध्यमाचे ५३ अतिरिक्त शिक्षक आणि प्राथमिकच्या ११ शिक्षकांचे समायोजन जिल्हा स्तरावर न करता, अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक स्तरावर करण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विविध शाळांमध्ये असलेली ६0 रिक्त पदांची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयात कळविण्यात येणार आहे, तसेच त्या ठिकाणावरील रिक्त जागांवर शिक्षकांचे विषय, माध्यम आणि बिंदूनामावलीनुसार समायोजन करण्यात येणार आहे. उर्दू शिक्षकांच्या जिल्ह्यात रिक्त जागा कमी असल्यामुळे त्यांचे इतर जिल्ह्यांमधील रिक्त पदांवरसुद्धा समायोजन होऊ शकते. विभाग स्तरावर समायोजन होणार असल्याने, उर्दू शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी)
मराठी माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आटोपल्यानंतर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या व प्राथमिकच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन विभाग स्तरावर होणार आहे. त्यामुळे रिक्त पदांची माहिती शिक्षण उपसंचालकांना कळविण्यात येईल.
-प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी.