उर्दू शाळेतील शिक्षिका गायब; वर्गाची जबाबदारी नातेवाइकावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:02 AM2017-11-14T02:02:42+5:302017-11-14T02:03:00+5:30
होय, हे खरे आहे. मनपाच्या शिक्षण विभागाचा कवडीचाही धाक नसल्यामुळे शिक्षकांनी मनमानीचा कळस गाठला आहे. शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क नातेवाईक महिलेला बसवून शिक्षिका गायब झाल्याचा प्रकार शिवसेनेचे नगरसेवक शशीकांत चोपडे यांनी सोमवारी चव्हाट्यावर आणला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: होय, हे खरे आहे. मनपाच्या शिक्षण विभागाचा कवडीचाही धाक नसल्यामुळे शिक्षकांनी मनमानीचा कळस गाठला आहे. शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क नातेवाईक महिलेला बसवून शिक्षिका गायब झाल्याचा प्रकार शिवसेनेचे नगरसेवक शशीकांत चोपडे यांनी सोमवारी चव्हाट्यावर आणला. जुने शहरातील मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. ४ व उर्दू मुलींची शाळा क्रमांक १0 मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे महापालिकेची मान शरमेने खाली झुकली आहे.
जुने शहरातील प्रभाग ९ मधील उर्दू मुलांची शाळा क्र.४ व उर्दू मुलींची शाळा क्रमांक १0 मध्ये शिक्षकांच्या मनमानी कारभाराला ऊत आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत शाळेतील शिक्षकांनी खेळ चालवल्याची बाब शिवसेनेचे नगरसेवक शशीकांत चोपडे यांच्या निदर्शनास आली. यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनीसुद्धा चोपडे यांना अवगत केले होते. सोमवारी दुपारी नगरसेवक चोपडे यांनी शाळेची आकस्मिक पाहणी केली असता मुख्याध्यापकांसह काही शिक्षिक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. हा प्रकार कमी म्हणून की काय, चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नातेवाईक महिलांना बसवून जबाबदार शिक्षिका अनुपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याविषयी चोपडे यांनी उपमहापौर वैशाली शेळके, महिला व बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली असता दोन्ही महिला पदाधिकार्यांनी शाळेवर धाव घेतली. उर्दू मुलांची शाळा क्र.४ ,उर्दू मुलींची शाळा क्र.१0 मधील शिक्षकांचे हजेरी पुस्तिका तपासली असता शिक्षिकांसह खुद्द मुख्याध्यापकही अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यावेळी शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची तपासणी केली असता कमालीची अस्वच्छता आढळून आली. स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड घाण साचल्याचे चित्र होते. याप्रकरणी मनपा प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्याध्यापक, शिक्षक रजेवर
संबंधित उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व नातेवाईक महिलेला वर्गात बसवणारी शिक्षिका रजेवर असल्याची बतावणी उपस्थित शिक्षकांनी केली. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षिकेने रजेसाठी शिक्षण विभागाकडे रीतसर अर्ज दाखल केला का, त्यांना शिक्षण विभागाने परवानगी दिली होती का, असा सवाल नगरसेवक शशी चोपडे यांनी उपस्थित केला आहे.
महापौर साहेब चाललंय काय?
शिक्षण विभागाचा कारभार लयास गेला असून, अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. शिक्षणाधिकार्यांना जाब विचारण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालण्यासाठी काहींनी थेट महापौरांपर्यंत ‘लॉबिंग’सुरू केल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ सुरू असल्यामुळे महापौर साहेब, मनपात हे चाललंय तरी काय, असे विचारण्याची वेळ आली आहे.
मुख्याध्यापक, शिक्षकांच्या मनमानीमुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास आम्हाला निर्णय घ्यावा लागेल.
- वैशाली शेळके, उपमहापौर