अकोला जिल्ह्यात युरियाचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 02:12 PM2019-09-11T14:12:13+5:302019-09-11T14:12:21+5:30
युरिया खताची मागणी वाढली आहे; परंतु सध्या या खताचा तुटवडा वाढला आहे.
अकोला: प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर परिणाम होत असून, त्यासाठी युरिया खताची मागणी वाढली आहे; परंतु सध्या या खताचा तुटवडा वाढला आहे.
पश्चिम विदर्भातील हवामान यावर्षी पिकांना बाधक ठरत असून, सतत तुरळक स्वरू पाचा पाऊस सुरू असल्याने पिकांमध्ये शेवाळ तयार झाले, जमीन ओली असून, पिकांना पुरेपूर सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. अन्नद्रव्याचा पुरवठाही होत नसल्याने पिकांच्या गरजेनुसार युरिया या रासायनिक खतांची मात्रा द्यावी लरगत आहे. विशेष करू न कपाशी व जेथे सोयाबीन पिवळे पडले तेथे युरियाची फवारणी करण्यात येत आहे. ओलिताच्या पिकांना सध्या युरियाची गरज आहे. तथापि, युरियाचा साठा अपुरा असल्याने शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार २८८ मेट्रिक टन युरियाची गरज होती. तथापि, २० हजार ७४ मेट्रिक टनच युरिया पोहोचला आहे.
यानंतर पुढच्या महिन्यात डीएपी आदी खतांची गरज भासणार आहे; परंतु डीएपीचा २ हजार मेट्रिक टनाचा तुटवडा आहे. एकूणच मिश्र खतांसह सर्व खताचा विचार केल्यास ७४ हजार ७९३ मेट्रिक टन खताची गरज होती. तथापि, ६६ हजार ३८१ मेट्रिक टन एवढेच खत मिळाले आहे. अशीच अवस्था पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्याची आहे.