गैरप्रकार रोखण्यसाठी ‘सी-व्हिजिल’ अप्लिकेशनचा वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:08 PM2019-03-12T13:08:11+5:302019-03-12T13:08:23+5:30
निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांच्या सुविधाकरिता ‘सी-व्हिजिल’ अप्लिकेशनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिली.
अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, अकोला लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सांगत, निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांच्या सुविधाकरिता ‘सी-व्हिजिल’ अप्लिकेशनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती देत, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज २४ तासात काढण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार असून, मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात २ हजार ६ मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्रांवर मतदान केंद्राधिकारी व मतदान अधिकारी म्हणून ७ हजार ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून, आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय पक्ष व उमेदवारांनी काय करावे व काय करू नये, यासंदर्भात सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीत देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, गजानन सुरंजे उपस्थित होते.
तक्रारीवर ९० मिनिटांत होणार कारवाई!
लोकसभा निवडणुकीत घडणाºया गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत नागरिकांच्या सुविधाकरिता ‘सी-व्हिजिल’ अप्लिकेशन तयार करण्यात आले असून, नागरिकांना कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास या अप्लिकेशनद्वारे व्हिडिओ किवा फोटो अपलोड करून तक्रार केल्यास प्राप्त तक्रारीवर ९० मिनिटांत कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणुकीचा असा आहे कार्यक्रम!
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार, २६ मार्च असून, २७ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २९ मार्चपर्यंत असून, १८ एप्रिल रोजी मतदान आणि २३ मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.
४८ शाळांमध्ये बांधणार रॅम्प; ‘व्हील चेअर’ही ठेवणार!
जिल्ह्यात ५ हजार ७४ दिव्यांग मतदार असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्प तयार करणे तसेच व्हील चेअर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रॅम्प नसलेल्या ४८ शाळांमध्ये रॅम्प बांधण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
गैरप्रकार रोखण्यासाठी सी-व्हिजिलचा वापर!
सुरू नसलेली विकासकामे राहणार बंद!
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने, आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यात सध्या सुरू असलेली विकासकामेच सुरू राहतील. कामांची ‘वर्क आॅर्डर’ दिली; परंतु प्रत्यक्षात कामे सुरू नाहीत, अशी सर्व विकासकामे आचारसंहितेच्या कालावधीत बंद राहणार आहेत, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.