पीक नुकसानाच्या फोटो पंचनाम्यासाठी ‘सीएम वॉर रुम’ कामाला लावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:45 AM2019-11-05T11:45:39+5:302019-11-05T11:45:46+5:30
पंचनामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वॉर रुम’ची यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.
- संतोष येलकर
अकोला : राज्यात बरसणाऱ्या अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्याकरिता पीक नुकसानाचे २४ तासांत फोटो (छायाचित्र) पंचनामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वॉर रुम’ची यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.
पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याने, विदर्भ -मराठवाड्यासह राज्यभरात ८० लाख हेक्टरवरील ३० हजार कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सुरू असलेला कहर आणि पिकांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेता, पीक नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी कृषी आणि महसूल यंत्रणा हतबल ठरत असल्याने, पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी विलंब लागणार आहे. त्यामुळे पीक नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना तातडीने पीक नुकसान भरपाईची मदत देण्याकरिता, शासनाने पीक नुकसानाचे २४ तासांत फोटो (छायाचित्र) पंचनामे करण्याचे आदेश देऊन, या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वॉर रुम’मधील यंत्रणेला कामाला लावावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
निवडून देणारा शेतकरी अडचणीत; यंत्रणेचा वापर करा!
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील ग्रामीण भागात शेतकºयांनी मतदान करून सत्ताधाºयांना निवडून दिले. अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाल्याने निवडून देणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याच्यावेळी पीक नुकसानाचे तातडीने फोटो पंचनामे करण्यासाठी मुख्यमंत्री ‘वॉर रुम’ यंत्रणेचा वापर करावा, त्यासाठी ‘वॉर रुम’ अंतर्गत बुथप्रमुख, शक्तीप्रमुख व विधानसभा मतदारसंघ विस्तारकांना कामी लावून गावनिहाय पीक नुकसानाच्या फोटो पंचनाम्याची माहिती संकलीत करून, शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत तातडीने द्यावी, अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.