एआयचा वापर प्रशासकीय कामात करणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:12 PM2024-02-14T16:12:17+5:302024-02-14T16:13:32+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ थाटात.
सागर कुटे, अकोला : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर सरकार प्रशासकीय कामात करणार आहे. याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात गुगलसोबत करार केल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. यामुळे राज्यातील विविध क्षेत्रात एआयचा सूक्ष्मपणे वापर केला जाणार आहे. एआयचा फायदा कृषी क्षेत्राला होणार असून, शेतकऱ्यांनी काय पिकविले पाहिजे, त्याची वाढ कशी झाली आहे, त्याचे मॉनिटरिंग आणि डाटा हा एआयव्दारे मिळू शकतो, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३८ वा दीक्षान्त समारंभ बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी दीक्षान्त सभागृहात पार पडला. यावेळी सन्माननिय अतिथी म्हणून आभासी पद्धतीने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पटेल, तर प्रमुख पाहुणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, माजी कुलगुरू जी. एम. भराड, पद्मश्री मोतीलाल मदान उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. यावेळी स्नातकांना पदव्या, पारितोषिके व पदकांचे वितरण करण्यात आले.