बडतर्फ शिक्षकांचा महापालिकेवर दबावतंत्राचा वापर
By Admin | Published: August 5, 2016 01:33 AM2016-08-05T01:33:22+5:302016-08-05T01:33:22+5:30
अस्थायी नऊ कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ; लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर.
अकोला: तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकाळात तात्पुरत्या काळासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अस्थायी नऊ कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी केली. बडतर्फ झालेल्या काही शिक्षकांनी मंत्रिमहोदय व स्थानिक आमदारांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची माहिती आहे.
तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शिक्षण विभागाने तात्पुरत्या काळासाठी एकूण ३१ अस्थायी शिक्षकांची नियुक्ती केली होती.
नियुक्त करण्यापूर्वी संबंधित शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी कोणताही हक्क किंवा दावा सांगता येणार नाही, अशी अट नमूद करण्यात आली होती. सुरुवातीला दर दोन महिन्यांनी अस्थायी शिक्षकांना नियुक्तीचे आदेश दिले जात होते. अस्थायी शिक्षकांना सेवेतून कमी करण्याचा मुद्दा प्रशासनाने लावून धरला असता, यामधील नऊ कला शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याप्रकरणी मनपाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शिक्षण विभागामार्फत अहवाल मागविण्यात आला. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सात कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली. हायकोर्टाच्या आदेशानुसार विभुते आणि झाडे नामक कला शिक्षकांची सेवा यापूर्वीच समाप्त करण्यात आली होती. बडतर्फ झालेल्या शिक्षकांनी मनपाच्या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान दिले. त्यावेळी न्यायालयाने शिक्षकांची याचिका स्वीकारली; मात्र मनपाच्या निर्णयाला स्थगिती न दिल्याने शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बडतर्फ झालेल्या शिक्षकांमध्ये काही जण शिक्षक संघटनांचे पदाधिकारी होते.
त्यांनी प्रत्येक वेळेस संघटनेच्या माध्यमातून शिक्षण विभाग व प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आता न्यायालयातून दिलासा मिळण्याची अपेक्षा धूसर होत असल्याचे लक्षात येताच काही मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची माहिती आहे.