मनपा अधिकार्यांवर दबाव तंत्राचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:08 AM2017-11-01T01:08:57+5:302017-11-01T01:09:48+5:30
अकोला : अवघ्या सात दिवसांपूर्वी पूर्व झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार सांभाळणार्या महापालिकेच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांना सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या मानापमान नाट्याला सामोरे जाण्याची वेळ आली.
अकोला : अवघ्या सात दिवसांपूर्वी पूर्व झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार सांभाळणार्या महापालिकेच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांना सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या मानापमान नाट्याला सामोरे जाण्याची वेळ आली. या विषयावर सबुरीने न घेता पूर्व झोनमधील भाजप नगरसेवकांनी एकत्र येत डॉ.भोसले यांना महापौरांच्या कक्षात पाचारण केले. नगरसेवकांनी एकत्र येऊन अधिकार्यांवर आगपाखड केल्याचा प्रकार ध्यानात घेता पूर्व झोनची सूत्रे पुन्हा नगरसचिव अनिल बिडवे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेत सहायक आयुक्त पदावर परिविक्षाधीन कालावधीसाठी दीड वर्षांपूर्वी जीतकुमार शेजव, डॉ.दीपाली भोसले यांची नियुक्ती झाली. पूर्व झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदावर कार्यरत अनिल बिडवे यांच्याकडे नगर सचिव पदाचा अतिरिक्त पदभार होता. दोन्ही पदभार सांभाळताना बिडवे यांची तारांबळ उडत असल्याचे पाहून प्रशासनाने सहायक आयुक्त डॉ.दीपाली भोसले यांच्याकडे पूर्व झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली. तसेच सहायक आयुक्त जीतकुमार शेजव यांच्याकडे पश्चिम झोनची जबाबदारी दिली. डॉ.भोसले यांनी २३ ऑक्टोबर क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच उण्यापुर्या सात दिवसांच्या आत त्यांना नगरसेवकांच्या मानापमान प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आली. महिला व बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल यांनी त्यांच्या प्रभागातील देशमुख नामक इसमाकडून अनधिकृत बांधकाम होत असल्याची सूचना केली असता या मुद्यावरून रामायण घडल्याची माहिती आहे. डॉ.भोसले नगरसेविकांचे भ्रमणध्वनी घेत नसल्याचा गैरसमज होऊन खदखद बाहेर आली. अवघ्या सात दिवसांपूर्वी पूर्व झोनचा पदभार स्वीकारणार्या डॉ.दीपाली भोसले यांच्या संदर्भात पूर्व झोनमधील भाजपच्या सर्व नगरसेवकांनी केलेली एकी पाहता शंकाकुशकांना ऊत आला आहे. नवख्या अधिकार्यांवर जाणीवपूर्वक दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.
महापौरांच्या दालनात माफीनामा नाट्य!
महापौर विजय अग्रवाल यांचा राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या असलेला अनुभव पाहता त्यांनी नगरसेवक व अधिकार्यांमधील नाराजीवर समन्वयातून तोडगा काढणे अपेक्षित आहे. त्यांच्या दालनात एकत्रित आलेले नगरसेवक व अधिकार्यांमध्ये रंगलेल्या माफीनामा नाट्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
-