मतदान नोंदविण्यासाठी जांभळ्या ‘स्केच पेन’चा वापर
By admin | Published: January 31, 2017 02:25 AM2017-01-31T02:25:04+5:302017-01-31T02:25:04+5:30
पदवीधर मतदारसंघ निवडणूक; जिल्हाधिका-यांची माहिती.
अकोला, दि. ३0- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत मतपत्रिकेवर पसंतीक्रमाचे मत नोंदविण्यासाठी मतदान कर्मचार्यांकडून दिल्या जाणार्या जांभळय़ा शाईच्या स्केचपेनचाच मतदारांना वापर करावा लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी दिली.
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर बाश्रीटाकळी, पातूर, मूर्तिजापूर व तेल्हारा या सातही तालुक्यात ६६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. मतदानासाठी जिल्हय़ातील मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकार्यांच्या पथकांसह चतुर्थश्रेणी कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक आणि पोलीस कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान नोंदविण्यासाठी कोणत्याही पेन, पेन्सील, किंवा बॉलपेनचा वापर करता येणार नाही, तर मतदान केंद्रांवर मतदान कर्मचार्यांकडून दिल्या जाणार्या जांभळ्या शाईच्या स्केचपेनचाच वापर करावा लागणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. मतदानात मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही एका उमेदवारांच्या नावापुढे ह्य१ह्ण हा क्रमांक नोंदविणे आवश्यक असून, इतर प्राधान्य क्रम देणे ऐच्छिक राहणार आहे.
उमेदवाराच्या नावापुढे एकापेक्षा जास्त प्राधान्यक्रम नोंदविल्यास मतपत्रिका बाद होणार आहे. प्राधान्य क्रमाचे अंक भारतीय अंक पद्धतीनुसार इंग्रजी, रोमण किंवा मराठी अंकाप्रमाणे नोंदविता येतील. ह्य१ह्णचा आकडा एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नोंदविल्यास मतपत्रिका बाद होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गजानन सुरंजे उपस्थित होते.
मतदार कर्मचार्यांना नैमित्तिक रजा मंजूर !
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारसंघातील कर्मचार्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. तसेच जिल्हय़ातील औद्योगिक संस्था, कारखाने, खासगी कार्यालये इत्यादी संस्थांच्या आस्थापनेवरील पदवीधर मतदारांना मतदान करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार तीन तास कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.