तणनाशकांचा केवळ वापर वाढला, प्रत्यक्षात तणनियंत्रण कमी!
By admin | Published: July 4, 2014 12:23 AM2014-07-04T00:23:09+5:302014-07-04T00:43:57+5:30
रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे.
अकोला: कीडींचा प्रादुर्भाव किंवा रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. गतवर्षी ९२ टक्के शेतकर्यांनी सोयाबीन पिकासाठी तणनाशकांचा वापर केला; परंतु तणनाशकांची नेमकी मात्रा न दिल्याने ८६ टक्के शेतकर्यांना तणावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचा धक्कादायक निष्क र्ष समोर आला आहे.
तणांमुळे पिकांचे होणारे नुकसान, मजुरीचे वाढते दर, मजुरांची टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे सोयाबीनचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. त्यांच्या या शिफारशींना संयुक्त संशोधन आढावा परिषदेची मान्यताही मिळाली आहे. त्यासाठी या विद्यापीठाने गतवर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या मुलाखती घेतल्या. त्याकरिता तालुके व गावं निवडण्यात आली होती. तणनाशके वापरासंबंधी असलेले ज्ञान, त्याचा अवलंब आदींबाबत या शेतकर्यांकडून माहिती घेण्यात आली. यावेळी सहभागी झालेल्या २४0 शेतकर्यांपैकी गतवर्षी २२१ (९२ टक्के ) शेतकर्यांनी सोयाबीन पिकामध्ये तणनाशकांचा वापर केल्याचे आढळून आले. आठ वर्षांपूर्वी केवळ ५ टक्के शेतकरी तणनाशकांचा वापर करीत होते.
४२ टक्के शेतकर्यांकडे सिंचनाची सोय नसल्याचे या अभ्यासात आढळून आले असून, ७ टक्के शेतकर्यांना हेक्टरी २१ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन झाल्याचे समजले. २२ टक्के शेतकर्यांनी पीक कर्ज घेतले नव्हते. ४२ टक्के शेतकर्यांनी फवारणीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. ४0 टक्के शेतकर्यांकडे बैलजोडी नव्हती, १७ टक्के शेतकर्यांकडे स्वत:चे ट्रॅक्टर होते. गतवर्षी प्रथमच १४ टक्के शेतकर्यांनी तणनाशकाचा वापर केला. ९0 टक्के शेतकर्यांनी तणनाशक तंत्रज्ञान पिकांसाठी वरदान असल्याची भूमिका मांडली. तणनाशक कसे वापरावे, मात्रा किती असावी, याबाबत शेतकर्यांमध्ये ज्ञानाचा अभाव जाणून आला.