वापरलेल्या रॅपिड टेस्ट ट्युब फेकल्या उघड्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:35 AM2020-07-08T10:35:42+5:302020-07-08T10:35:51+5:30
नगरसेवक राजू उगले यांच्या घराजवळील उकिरड्यावर या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब फेकून दिलेल्या दिसून आल्या आहेत.
- संतोषकुमार गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर: कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी वापरलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब उघड्यावर फेकून दिल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला आहे. नगरसेवक राजू उगले यांच्या घराजवळील उकिरड्यावर या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब फेकून दिलेल्या दिसून आल्या आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाशी लढा देत असताना, दुसरी आरोग्य विभागाचे काही कर्मचारी रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब उघड्यावर फेकून देत, कोरोनाचा संसर्गाला आमंत्रण देत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पातूर शहरात कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे ४७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. नागरिकांची तपासणी करण्यासाठी वापरलेल्या काही रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब नगरसेवक राजू उगले यांच्या घरासमोरील उकिरड्यावर फेकून दिल्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युबच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या रॅपिड टेस्ट ट्युब फेकल्या की आणखी कोणी, नगरसेवक उगले यांच्या घराजवळ या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब आल्या कशा, याची चौकशी आता सुरू झाली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ट्युब फेकल्या असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने घेणाºया वैद्यकीय चमूच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने वापरलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब सीलबंद करून घंटागाडीद्वारे डम्पिंग ग्राउंडवर नष्ट करण्यात आल्या. आता या वापरलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब उघड्यावर कोणी फेकल्या, याची चौकशी करण्यात येणार आहे आणि पोलिसात तक्रार देण्यात येणार आहे.
- सोनाली यादव, मुख्याधिकारी, न.प. पातूर
रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे ४७७ नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. वापरलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युबचे निर्जंतुकीकरण करून एका पिशवीमध्ये त्या नष्ट करण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडे दिल्या होत्या; परंतु भीतीचे कारण नाही. त्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युबचे निर्जंतुकीकरण केले होते.
-डॉ. विजय जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, पातूर
रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब उघड्यावर फेकण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर त्या टेस्ट ट्युब गोळा करण्यात आल्या आहेत. त्या टेस्ट ट्युब उघड्यावर कोणी फेकल्या, याचा तपास पोलीस करणार आहेत.
-दीपक बाजड,
तहसीलदार, पातूर