अकाेला : निवासस्थान रिकामे करा, जिल्हाधिकाऱ्यांची मनपा आयुक्तांना नाेटीस
By आशीष गावंडे | Published: September 14, 2022 08:29 PM2022-09-14T20:29:36+5:302022-09-14T20:29:58+5:30
महसूलच्या भूखंडावर विनापरवानगी बंगल्याचे निर्माण
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील शासकीय निवासस्थान पाडून त्याठिकाणी मनपा आयुक्तांसाठी ५ हजार चाैरस फुट क्षेत्रफळावर टाेलेजंग बंगला उभारण्याचे प्रकरण महापालिका प्रशासनाच्या अंगलट आले आहे. ‘पीडब्ल्यूडी’च्या परवानगीशिवाय उभारण्यात आलेले निवासस्थान अनधिकृत असल्यामुळे तातडीने रिकामे करण्याची नाेटीस वजा निर्देश जिल्हाधिकारी निमा अराेरा यांनी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे प्रशासकीय यंत्रणांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समाेर आले आहे.
महापालिका आयुक्तांना स्वतंत्र निवासस्थान नसल्यामुळे भाडेतत्वावर बंगला घेऊन त्यामध्ये आयुक्तांचा मुक्काम राहत हाेता. भाड्याची रक्कम वर्षाकाठी लाखाेंच्या घरात जात असल्याची बाब ध्यानात आल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी दिवेकर क्रीडा संकूलालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या निवासस्थानाची जागा आयुक्तांच्या निवासस्थानासाठी आरक्षित करण्याची मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे केली हाेती. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने २०१५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार केला हाेता.
त्यावेळी जिल्हाप्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत देखभाल दुरुस्तीच्या जबाबदारीसह ‘पीडब्ल्यूडी’चे निवासस्थान मनपा आयुक्तांना हस्तांतरित केले. त्यानंतर मनपाने या जागेवरील जुने निवासस्थान जमिनदाेस्त करीत टाेलेजंग बंगला उभारला. यामुळे अटी व शर्तीचा भंग झाल्याची तक्रार जिल्हाप्रशासनाकडे करण्यात आली हाेती. प्राप्त तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी निमा अराेरा यांनी याप्रकरणी मनपाला नाेटीस जारी केली आहे. यामध्ये ‘पीडब्ल्यूडी’च्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे तातडीने खुलासा करावा, अन्यथा निवासस्थान रिकामे करण्याचे नाेटीसमध्ये नमूद केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.