लस घेतली मार्च महिन्यात, संदेश मिळाला मे महिन्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:24+5:302021-05-14T04:18:24+5:30
अकोला : कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अकोल्यातील एका ७० वर्षीय व्यक्तीला ११ मे राेजी ...
अकोला : कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अकोल्यातील एका ७० वर्षीय व्यक्तीला ११ मे राेजी लसीचा पहिला डोस यशस्वीरित्या घेतल्याचा संदेश आला. ही व्यक्ती ११ मे रोजी लसीच्या दुसऱ्या डाेससाठी लसीकरण केंद्रावर गेली असता, हा धक्कादायक प्रकार घडला. या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना लसीचा दुसरा डोस त्यादिवशी मिळाला नसल्याने लाभार्थीचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. अकोल्यातील रहिवासी असलेले ७० वर्षीय दिलीप पारेख यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डाेस ४ मार्च रोजीच घेतला होता. तसा संदेशही त्यांना प्राप्त झाला होता. त्यानुसार त्यांना ४ एप्रिल रोजी लसीचा दुसरा डोस मिळणार होता, मात्र त्यांना वेळेवर लस मिळाली नाही. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी ११ मे रोजी ते सकाळीच भरतीया रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर पोहोचले. याठिकाणी दुसऱ्या डोसच्या यादीत तुमचे नावच नसल्याचे कारण सांगत त्यांना लस देण्यात आली नाही. त्यामुळे हताश होऊन ते माघारी परतले. लसीकरण केंद्राबाहेर पडत नाही, तोच त्यांना मोबाईल क्रमांकावर एक संदेश प्राप्त झाला. त्यानुसार त्यांना ११ मे रोजी कोविशिल्डचा पहिला डोस यशस्वीरित्या घेतल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. कोविन संकेतस्थळावरील गोंधळामुळे सर्वसामान्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आता लसीचा दुसरा डोस केव्हा मिळेल, अशी चिंता लाभार्थीने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
लस न घेताच मिळाले प्रमाणपत्र
दिलीप पारेख यांनी ११ मे रोजी लसीचा एकही डोस घेतला नसताना त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. या गोंधळामुळे लाभार्थीमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
आता दुसरा डाेस मिळणार जून, जुलैमध्ये
कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना लसीचा दुसरा डोस एक महिन्याच्या कालावधीत म्हणजेच ४ एप्रिल रोजी मिळणे अपेक्षित होते, मात्र त्यांना लस न मिळाल्याने त्यांनी ४ मे रोजी लसीकरण केंद्राला भेट दिली. लसीकरण केंद्राबाहेर पडताच या प्रकारचा संदेश आल्याने ते चक्रावले. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर दुसऱ्या डोसची तारीख जून महिन्यातील देण्यात आली आहे.