मनपा क्षेत्रात लसीकरण ठप्प; ग्रामीण भागात फक्त ४५ केंद्रे सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:45+5:302021-04-25T04:17:45+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड लसीकरण मोहिमेमुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड लसीकरण मोहिमेमुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, गत महिनाभरापासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. कधी कोविशिल्ड, तर कधी कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्याने अनेकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे जिल्ह्याला नियमित लसीचा पुरवठा होत असला, तरी हा साठा केवळ दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच असल्याने लसीकरण मोहीम राबविताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लाभार्थींना लस देण्यास सुरुवात करण्यात आल्याने जिल्ह्यात १५३ केंद्रांवरून लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती. मात्र, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने
जिल्ह्यातील १०८ केंद्रांवरील लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे.
सोमवारी लस मिळण्याची शक्यता
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात लसीकरण मोहीम प्रभावित झाली आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यासाठी लसीचा आणखी साठा उपलब्ध होणार आहे. मात्र, हा साठा नेमका किती असेल, याविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही.
रविवारी मोहीम ठप्प पडण्याची शक्यता
शनिवारी मनपा क्षेत्रात लसीकरण मोहीम ठप्प असली तरी ग्रामीण भागातील ४५ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. मात्र, शनिवारी जिल्ह्यात केवळ दोन हजार डोस शिल्लक होते. या डोसचा वापर शनिवारी करण्यात आला. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात कोविड लसीकरण पूर्णत: बंद राहण्याची शक्यता आहे.