दोन आठवड्यांत फक्त ५० गर्भवतींचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 10:33 AM2021-08-03T10:33:12+5:302021-08-03T10:33:25+5:30
Corona Vaccine : पहिल्या दोन दिवसांत गर्भवतींमध्ये चांगला उत्साह दिसून आला; मात्र आता लसीकरणाकडे त्यांची पाठ असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अकोला : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता २१ जुलैपासून जिल्ह्यात गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दोन दिवसांत गर्भवतींमध्ये चांगला उत्साह दिसून आला; मात्र आता लसीकरणाकडे त्यांची पाठ असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही स्थिती पाहता गर्भवतींमध्ये लसीकरणाविषयी आणखी जनजागृती करण्याची गरज आहे. सद्य:स्थितीत कोविडची दुसरी लाट ओसरली असून, रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्भवतींच्या लसीकरणासही मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा स्त्री रुग्णालयात २१ जुलैपासून गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली. लसीकरणापूर्वी गर्भवतींचे समुपदेशन करण्यात आले. तसेच लसीमुळे बाळाला कुठलाही धोका नसल्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. त्यामुळे मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ४१ गर्भवतींनी लस घेतली होती, मात्र दोन दिवसांच्या उत्साहानंतर आता त्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागात लसीकरण बंदचा फटका
गर्भवतींच्या लसीकरणास जिल्हा स्त्री रुग्णालय येथून सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवार ३० जुलैपासून ग्रामीण भागातही लसीकरणास सुरुवात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र ग्रामीण भागात लसीच्या तुटववड्यामुळे सुमारे चार दिवसांपासून लसीकरण ठप्प आहे. लसीकरण मोहीम बंद असल्याने त्याचा फटका गर्भवतींच्या लसीकरणास बसत आहे.
भीतीमुळे गर्भवतींची माघार
गर्भधारणेनंतर महिलांना कुठलीच लस दिली जात नाही. लस घेतल्यास होणाऱ्या शिशूवर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, असा समज आतापर्यंत होता. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाल्याने आपत्कालीन परिस्थिती म्हणून गर्भवतींच्या लसीकरणासही मान्यता देण्यात आली आहे, मात्र लसीचा गर्भातील शिशूवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती गर्भवतींसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आहे. या भीतीपोटीच बहुतांश गर्भवती लसीकरणातून माघार घेत आहेत.
कोविड प्रतिबंधक लस ही गर्भवतींसाठीदेखील सुरक्षित आहे. त्यामुळे मनात कुठलीच भीती न बाळगता त्यांनी लस घ्यावी. जेणेकरून त्यांना कोविडपासून संरक्षण मिळेल. जिल्ह्यात गर्भवतींना लस देण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन केले जात आहे.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला