लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी लवकरच लसीकरण - डॉ.कि.मा. ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 07:31 PM2020-09-12T19:31:19+5:302020-09-12T19:31:43+5:30
आजाराने गुरांच्या मृत्यूची संख्या फारच कमी असल्याने पशुपालकांनी घाबरू नये आवाहन जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.कि.मा ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना केले.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात सध्या गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण होत आहे. तीन तालुक्यांमध्ये अनेक गुरे या आजाराने त्रस्त असून हळूहळू जिल्ह्यात पसरत असल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हा आजार काळजी घेल्यास दूर होऊ शकतो. पशुपालकांनी गुरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, तसेच या आजाराने गुरांच्या मृत्यूची संख्या फारच कमी असल्याने पशुपालकांनी घाबरू नये आवाहन जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.कि.मा ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना केले.
लम्पी स्किन आजार काय आहे?
लम्पी हा विषाणूजन्य साथीचा चर्मरोग आहे.हा रोग मुख्यत्व गायींमध्ये आढळतो. म्हशीवर क्वचीतच आढळतो. तसेच शेळी, मेंढींना हा आजार होत नाही. संकरीत आणि विदेशी गायींमध्ये या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. लहान वासरांसाठी हा रोग धोकादायक ठरू शकतो. या रोगाचा प्रसार उष्ण व दमट हवामानात जास्त होतो. पावसाळ्यात आजार पसरण्याची भिती अधिक आहे. हिवाळ््यात या आजाराचा प्रसार कमी होतो.
लम्पी स्किन डिसीज आजार कशामुळे होतो?
लम्पी स्किन डिसीज हा आजार मुख्यत्वे किटकांमुळे होतो. चावणाºया माशा, डास, गोचीड, निरोगी गुरे बाधीत गुरांच्या संपर्कात आल्याने, दुषीत चारा व पाणी आदींमुळे हा आजार होतो. या आजारात गुरे अशक्त होतात.दुध उत्पादनात घट होते, गर्भपात, प्रजनन क्षमतेत घट, त्वचा खराब व विकृत होते. या आजाराने मृत्यूचे प्रमाण १ ते ५ टक्के आहे. जिल्ह्यात अजुनपर्यंत एकाही गुराचा मृत्यू झालेला नाही.
या आजाराची लक्षणे काय आहेत?
लम्पी स्किन डिसेज आजाराची लागण झाल्यास गुरांना सुरूवातीस भरपूर ताप येतो. डोळ््यातून व नाकातून स्त्राव येतो. गुरे चारा खाने व पाणी पिणे बंद करतात. दृष्टी बाधीत होते. त्वचेवर गाठी येतात. डोके, मान, पाय, कास भागात १० ते १५ मिमी व्यासाच्या गाठी येतात.
लम्पी स्किन आजारावर उपाय योजना काय ?
आपल्या जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळलेला आहे. आजाराची लक्षणे दिसताच उपचार सुरू करण्यात येतात. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक बाधीत गुरे उपचाराने बरी झाली आहेत. पशुपालकांनी बाधीत गुरांना निरोगी गुरांपासून दूर ठेवावे. तसेच गुरांचे गोठे स्वच्छ ठेवल्यास या आजारापासून गुरांना दूर ठेवता येउ शकते.राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातून हा रोग आपल्याकडे आला आहे. गुरांच्या बाजारातून संक्रमण वाढले आहे. त्यामुळे, काही दिवस गुरांचे बाजार बंद ठेवावे. लम्पी स्किन आजाराची लागण होउ नये यासाठी लवकरच लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पशु वैद्यकीय अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे भार वाढलेला आहे. तरीही लवकरच तीन लाख रुपयांच्या लसी विकत घेउन गुरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लम्पी स्किन आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनासह पशुपालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.