कर्मचाऱ्यांनतर दुर्धर आजार असणाऱ्यांना देणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 04:11 PM2020-11-04T16:11:12+5:302020-11-04T16:11:30+5:30
हे काम युद्ध पातळीवर पुर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना प्रतिबंधासाठी पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या अनुषंगाने पहिल्या फळीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंर दुर्धर आजार असलेल्या व बालकांना व नंतर सामान्य नागरिकांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, कोरोना प्रतिबंधासाठीच्या मोहिमेत पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांची संख्या निश्चिती झाली नसून हे काम युद्ध पातळीवर पुर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानुषंगाने प्रशासकीय यंत्रणेकडून जिल्ह्यातील सविस्तर माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असून अनुषंगीक विषयान्वये तीन नोव्हेंबर रोजी छोटेखानी आढावा बैठकही जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आली असल्याची माहिती आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याकडूनही माहिती संकलनासंदर्भात नियमित आढावा घेण्यात येत आहे. २३ ऑक्टोबर रोजीच्या प्रधान सचिवांच्या पत्राच्या अनुषंगाने त्वरित व गुणात्मक दर्जाने माहिती संकलन करण्यास यंत्रणांनी प्राधान्य देवून शासनस्तरावर मागविण्यात आलेली माहिती त्वरित सादर करण्याच्या सुचनाही दिल्या गेल्या आहेत.
प्रामुख्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आयसीडी विभाग आणि जिल्ह्यातील खासगी रुग्णालये यांची यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष टिमकडून माहिती संकलीत करण्यात येत आहे. या टिममधील सदस्यांचीच छोटेखानी बैठक जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षात झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
किमान सहा महिने संभाव्यता चालणाऱ्या या मोहिमेच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्या नेमक्या किती कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल याचा आकडा निश्चित झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का? लस कशाा पद्धतीने देणार, त्याच्या साठवणुकीसाठी आवश्यक शितकरण उपकरणांची साखळी कितपत उपलब्ध आहे. त्यानंतर त्याची वाहतूक, वाहन संख्या आणि या संपूर्ण मोहिमेसाठी जिल्हास्तरावर नेमका किती खर्च लागले हे मुद्दे प्रकर्षाने या माहिती संकलनामध्ये समाविष्ठ आहे.