मासिक पाळीच्या काळात घेता येते लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:30 AM2021-05-05T04:30:27+5:302021-05-05T04:30:27+5:30
अकाेला : १८ वर्षांवरील सर्वांनाच काेराेना लसीकरणासाठी माेहीम राबविली जात असल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. एकीकडे लसीकरणासाठी जनजागृती केली ...
अकाेला : १८ वर्षांवरील सर्वांनाच काेराेना लसीकरणासाठी माेहीम राबविली जात असल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. एकीकडे लसीकरणासाठी जनजागृती केली जात असून, दुसरीकडे अनेकांना लससंदर्भात शंका आहेत. या शंकांपैकी एक शंका म्हणजे मासिक पाळीच्या काळात कोरोना लस टोचून घेणे याेग्य आहे का? वैद्यकीय तज्ज्ञांनी ही शंका दूर करत मासिक पाळीच्या कालावधीत लस घेणे सुरक्षित असून, त्यासंदर्भात सध्या समाजमाध्यमातून ‘व्हायरल’ होत असलेल्या गोष्टी तद्दन अशास्त्रीय आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे स्पष्ट केले आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांत लस घ्यावी का? या शंकेचा जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. आरती कुलवाल यांनी चांगलाच समाचार घेतला. मासिक पाळीत प्रतिकारशक्ती कमी होते, याचा काहीही संबंध नाही. मासिक पाळी सुरू असताना किंवा त्याआधी आणि नंतरही लस घेणे हे पूर्ण सुरक्षित आहे. त्याचा मासिक पाळीशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार स्तनदा मातांनी घ्यावी लस
स्तनपान करत असलेल्या, अगदी नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांनीही लस घ्यायला हरकत नाही.
बाळाला आईच्या दुधातून अँटिबॉडीज जातात. त्यामुळे लस घेणे स्तनदा मातेसाठीही सुरक्षित आहे. असे भारतीय स्त्री राेग संघटनेने स्पष्ट केले आहे; परंतु या संदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून कुठल्याही सूचना नाहीत. त्यामुळे हाय रिस्क प्रेग्नन्सी, रक्तात गाठी होण्याचे प्रमाण, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बऱ्या झालेल्या महिला, मधुमेह, रक्तदाब असलेल्या महिला यांनीही डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार लस घ्यावी. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटना असे सांगतात, की गरोदर महिलांनीही लस घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र, गरोदर महिलांनी हा निर्णय स्वत:च्या स्वत: न घेता आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ते म्हणतील त्याप्रमाणे करावे.
काेट....
मासिक पाळीचा आणि लस टाळण्याचा काही संबंध नाही. मासिक पाळी, प्रतिकारशक्ती यांच्या परस्परसंबंधांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे चुकीच्या माहितीला बळी पडू नये. महिलांनी लस घ्यावी, मासिक पाळीच्या काळातही लस घ्यायला काहीच हरकत नाही.
-डॉ. आरती कुलवाल