आदिवासी भागात लस पोहोचलीच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:19 AM2021-05-18T04:19:25+5:302021-05-18T04:19:25+5:30
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहोचली असल्याचा आरोग्य यंत्रणेचा दावा फ़ोल ठरत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासीबहुल ...
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहोचली असल्याचा आरोग्य यंत्रणेचा दावा फ़ोल ठरत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात अद्यापही लस पोहोचली नसल्यामुळे आदिवासी नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती समाेर आली आहे़ दरम्यान, आदिवासीबहुल भागात लस उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे शिबिराचे आयाेजन करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे.
संसर्गजन्य काेराेना विषाणूचा सर्वत्र प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे काेराेना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली आहे़ लसीचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध नसल्यामुळे लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे़ शहरी भागात किंवा तालुका स्तरावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेत आहे़ दुसरीकडे पश्चिम विदर्भातील आदिवासीबहुल भागात अद्यापपर्यंतही लसीकरणापासून आदिवासी बांधव वंचित असल्याचे समाेर आले आहे़ अकाेला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात लसीकरण केंद्र सुरु न केल्यामुळे संबंधित नागरिकांना खडतर प्रवास करून किमान २० ते २५ किमी अंतरावरील प्राथमिक आराेग्य केंद्रांत जावे लागत आहे़ त्या ठिकाणी जाईपर्यंत लसीचा साठा संपल्याचे कारण समाेर केले जात आहे़ ही बाब पाहता आराेग्य यंत्रणेने आदिवासी भागातच लसीकरण केंद्र सुरु करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे़
हा भाग आदिवासीबहुल
अकाेला जिल्ह्यात पातूर, अकाेट, वाशिम जिल्ह्यात मानाेरा, मालेगाव तसेच बुलडाणा जिल्ह्यात मेहकर, जळगाव जामाेद व संग्रामपूर तालुका आदिवासीबहुल भाग आहे़ या भागातील दुर्गम,अतिदुर्गम व डाेंगराळ भागात दळवळणाच्या सुविधा नसल्यामुळे स्थानिकांना लस घेण्यासाठी वाट तुडवत प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये यावे लागत आहे़
आदिवासीबहुल भागात तसेच शासकीय आदिवासी आश्रम शाळा, वसतिगृहांमध्ये लसीकरणासाठी शिबिराचे आयाेजन करण्याची मागणी पत्राद्वारे वैद्यकीय आराेग्य यंत्रणेकडे केली आहे़ लस घेण्याबाबत आदिवासींमध्ये जनजागृती केली जात आहे़ परंतु लस उपलब्ध नसल्यामुळे जनजागृती करताना कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे़
-राजेंद्र हिवराळे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग अकाेला